Saturday, June 22, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजदहा डोक्यांनी विचार...

दहा डोक्यांनी विचार आणि दोन हातांनी काम करतो ‘रावण’!

पुस्तक प्रकाशन समारंभ म्हटला की, कुठलेतरी संग्रहालय किंवा एखाद्या शाळेचा त्यातल्यात्यात चांगला वर्ग, त्याहूनही बरी जागा म्हणजे समजमंदिर हॉल, अशी निदान मराठी पुस्तक समारंभाची नेहमीची ठिकाणे!! नाही म्हणायला गेल्यास गेल्या एक-दीड महिन्यापूर्वी मौजने प्रकाशित केलेल्या सत्यकथेतील निवडक कवितांच्या दोन खंडाच्या प्रकाशनाच्यानिमित्त मौजने प्रथमच मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे ‘रावण’च्या अभिजित पानसे यांनी रविवारी दुपारनंतर ठाण्याच्या टीप टॉप प्लाझामध्ये आयोजित केलेला कवी कुसुमाग्रज यांच्या अप्रकाशित साहित्याचा / “क & ख”चा प्रकाशन समारंभ.

पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असल्याने गर्दी जमणारच, असे हवेतील विधान करून चालणार नाही. नेते तर असणारच. पण त्यांच्याबरोबरच साहित्यप्रेमी, लहानमोठे साहित्यिक, चित्रपट आणि टीव्हीचे कलाकार आणि अर्थात ज्येष्ठ पत्रकार यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. आणि हो सांगायचे विसरलोच. समारंभाच्या हॉलमधील आयोजन तर थेट एखाद्या वृत्तवाहिनीच्या समारंभासारखेच होते. हा सुखद धक्का होता. ना कुरकुरणाऱ्या खुर्च्या होत्या, ना गरगर आवाज करणारे नेहमीचे जुने पंखे होते. सारा मामला एकदम कुल.. कुल.. होता. सोबतच अगदीच ‘कुल’ वाटू नये म्हणून चहा/कॉफीची सोय टेबलाजवळ येऊन केली जात होती.

खरे तर समारंभ आयोजनाचे वर्णन करण्यात मुद्दामच लांबण लावले कारण आपल्याकडील नामवंत प्रकाशन संस्था (काही अपवाद वगळता) असे समारंभ अत्यन्त कंजुषीत करतात. हे सर्वश्रुत आहे, म्हणूनच थोडा विस्तार केला. समारंभातील एक वक्ते कवी प्रा. अशोक बागवे यांनी तर ‘मराठी पुस्तक’ समारंभात केवळ साडे तेरा माणसेच उपस्थित असतात, असा उल्लेख करून विदारक चित्रच उभे केलेले होते. या विदारक चित्राला उलटेपालटे करणारा सुखद अनुभव आला म्हणूनच पांढऱ्यावर काळे जरा अधिक झाले असावे.

“रावणाची दहातोंडे हे प्रतीक आहे की माणसाने दशदिशाना घडणाऱ्या गोष्टींकडे पाहावे, बहुश्रुत व्हावे, हे प्रतीक अभिजित पानसे यांनी पब्लिकेशनचे नाव निडताना वापरलं आहे, हे छान आहे’, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठ थोपटल्यावर अजून काय पाहिजे? स्वतः पानसे यांनीही ‘दहा डोक्यांनी विचार आणि दोन हातांनी काम’ करण्यावरच भर असल्याची ग्वाही दिली. पानसे हे मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्याकडे शेकडो योजना चालत येतीलच, असे त्यांचे चाहते कुजबुजत होते. लेखक व कवी यांनी आपल्या शब्दांची ताकद सरकारला दाखवली पाहिजे तसेच आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

नाशिक येथील डॉ. नागेश कांबळे यांच्याकडे तात्यासाहेबांचे हे अप्रकाशित साहित्य पडून होते. कांबळे यांनी ते प्रकाशित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना त्यात यश आले नाही. या कार्यक्रमात अभिनेते जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री व अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी कुसुमाग्रज यांच्या कथा आणि कवितांचे अभिवाचन केले. संगीतकार कौशल इनामदार ‘पृथ्वीचे प्रेमागीत’ ही कविता सादर केली. संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांनी तात्यासाहेबांच्या कवितांना चाली लावण्याचे आश्वासन दिले. या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे यांनी ‘स्वातंत्र्यदेवींची विनवणी’ ही कविता वाचून दाखविली.

जाता जाता आठवलं म्हणून…

“The successful publishing house is the one that can guess ahead, not the one that imitates the past” हे रावण आणि सहकाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कारण “my grief is that publishing world, the book writing world is an extraordinarily shoddy, dirty, dingy world..”. म्हणूनच प्रत्येक पाऊल खबदारीने उचलावे लागेल…

Continue reading

चला.. राजकीय प्रदूषणाचा भिकार खेळ संपला!

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी शब्दांची 'होळी' वा 'शिमगा' साजरा केला होता. केवळ शब्दच कानावर पडत होते...

राजकारण की समाजकारण म्हणजे अंडे पहिले की कोंबडी?

खरेतर हा सनातन प्रश्न आहे राजकारण की समाजकारण? महाराष्ट्रात हा प्रश्न घेऊन लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर समोरासमोर उभे ठाकले होते. यापासून तो अगदी आज, आतापर्यंत राजकारणानेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ''the darkest places in hell are...

टाकेहर्षची कहाणी.. करूण की संतापजनक?

महाराष्ट्रातील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या त्रंबकेश्वर देवस्थानापासून अवघ्या 20/22 किलोमीटर्स वर असलेल्या टाकेहर्ष गावाची ही म्हटलं तर करूण म्हटलं तर संतापजनक कहाणी! अवघ्या 250 घरांची ही कहाणी. टाकेहर्ष, हे गाव आदिवासी पट्ट्यातील असून तेथे मूलभूत...
error: Content is protected !!