मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
आपला चार दिवसांचा शासकीय दौरा आटोपून लंडनहून मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. उद्धव ठाकरे गटाच्या काही आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलेल्या ७९ पानांच्या निवेदनाचाही अभ्यास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
त्याआधी आज ठाकरे गटाच्या विधानसभा तसेच विधान परिषदेच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विधान भवनातल्या कार्यालयात त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ७९ पानी निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला गेला आहे. या निर्णयाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने या निवेदनाद्वारे केली आहे.
त्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय तातडीने घ्यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे पत्र दिल्याचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी नंतर माध्यमांना सांगितले.

