मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.
तु. शं. हे दीर्घकाळ औरंगाबाद येथे सरस्वती भुवन कला – वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक / विभागप्रमुख होते. त्यांनी कथा, काव्य आणि समीक्षा लिहिली. प्रा. प्रकाश मेदककर यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन – संपादन केले आहे. साहित्य अकादमीसाठी आधुनिक मराठी कवितांचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रा. कुळकर्णी यांनी संपादित केला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेशी आणि परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाशी ते अनेक वर्षे निगडीत होते. परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला होता. नरहर कुरुंदकर यांचे ते निकटचे स्नेही होते.
अनेकांनी प्रा. तु. शं. कुळकर्णी यांना औरंगाबादेत समर्थनगर ते सरस्वती भुवन परिसर आणि समर्थनगर ते साहित्य परिषद या रस्त्यावर पायी चालताना अनेकदा पाहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत.