पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काल रात्री उशिरा फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले. पॅरिसच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदी यांची नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट झाली. मॅक्रॉन यांनी पंतप्रदान मोदी यांच्याकरीता रात्रभोजचे आयोजनही केले होते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी काल, 10 फ्रेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पॅरिसमध्ये आज मोदी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक (एआय) कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविणार आहेत. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत सर्वजण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहेत.

या दौऱ्यात मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी 2047 होरायझन रोडमॅपसंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत. या भेटीत हे दोन्ही नेते फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी मार्सेल या फ्रान्सच्या ऐतिहासिक शहरालाही भेट देणार आहोत. यासोबतच ते आंतरराष्ट्रीय उष्णसंजलन प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पालाही (International Thermonuclear Experimental Reactor project) थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर प्रकल्पालाही भेट देणार आहोत. भारत हा या प्रकल्पाच्या भागीदार देशांच्या संघाचा सदस्य आहे. याशिवाय माझरी युद्ध स्मशानभूमीला भेट देऊन पंतप्रधान मोदी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

फ्रान्सवरून मोदी जाणार अमेरिकेत
फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यावर्षी जानेवारीत ट्रम्प यांनी अमेरिकेची दुसऱ्यांदा धुरा सांभाळली. निवडणुकीतील त्यांच्या ऐतिहासिक विजयानंतर आणि नंतर शपथविधीनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याच्या यशाच्या पायावर नवी उभारणी करण्याची तसेच तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचिकता या क्षेत्रांसह दोन्ही देशांमधील परस्पर भागीदारीला नवी उंची मिळवून देण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.