गेल्या दोन दिवसांपासून बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने थायलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल श्रीलंकेला पोहोचले. श्रीलंका दौऱ्यावरून परतताना उद्या ते थेट रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूला भेट देणार आहेत. तेथे ते रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण होणार आहे. रामेश्वरम-तांबाराम (चेन्नई) या नवीन रेल्वेलाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते नव्या पंबन रेल्वे पुलाचे (भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे) उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील. त्यानंतर दुपारी पाऊणच्या सुमारास ते रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. दुपारी दिडच्या सुमारास ते रामेश्वरममध्ये 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच राष्ट्रार्पण करतील. यावेळी पंतप्रधान मोदी एका मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत.

रामायणातल्या दाखल्यानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते. त्यामुळे या पुलाला एक सखोल सांस्कृतिक महत्त्व आहे. रामेश्वरम द्विपला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय नमुना असून त्याच्या बांधकामासाठी 550 कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाची लांबी 2.8 किलोमीटर आहे. 99 स्पॅन इतका विस्तार असून 72.5 मीटर उर्ध्व विस्तार आहे. 17 मीटर उंचीपर्यंत वर उचलण्याची क्षमता असल्याने रेल्वे आणि जहाजांची ये-जा सहज होऊ शकणार आहे. पोलादी बळकटीकरण, उच्च दर्जाचे संरक्षणात्मक रंग आणि पूर्णपणे जोडणीसह बांधलेला असल्याने पुलाचा टिकाऊपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे देखभालखर्च कमी लागणार आहे. भविष्यातील गरजा सामावून घेण्यासाठी दुहेरी लोहमार्ग टाकता येतील, या पद्धतीची रचनादेखील तेथे करण्यात आली आहे. सागरी वातावरणाचा विचार करून या पुलाला पॉलीसिलोक्सेन कोटिंग केले असून त्यामुळे त्याचे गंजण्यापासून रक्षण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूत 8,300 कोटींचे विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करून राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमध्ये एनएच-40च्या 28 किलोमीटर लांबीच्या चौपदरी वालजापेट-रानीपेट महामार्गाचे भूमिपूजन, पुद्दूचेरी विभागातल्या एन एच 332वरच्या विलूप्पूरम – पुद्दूचेरी या 29 किमी लांबीच्या महामार्गचे लोकार्पण, एनएच -32वरच्या पुंडियंकूपम – सट्टनाथपुरम विभागातल्या 57 किमी लांबीच्या मार्गाचे, एनएच 36च्या चोलपुरम – तंजावर या 48 किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण होणार असून हे महामार्ग अनेक तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळांना जोडतील. शहरांमधील अंतर कमी करतील आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास मदत करतील. स्थानिक शेतकर्यांच्या शेती उत्पादनांना जवळच्या बाजारपेठेत वाहतूक करण्यास आणि स्थानिक चामड्याच्या, लघुद्योगांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देण्यास सक्षम करतील.