Tuesday, January 14, 2025
Homeपब्लिक फिगरपंतप्रधान मोदी आज...

पंतप्रधान मोदी आज तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगणात आदीलाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 56 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेकविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर दुपारी पंतप्रधान तामिळनाडूत कल्पक्कम येथे ‘भाविनी’ला भेट देतील.

पंतप्रधानांची हैदराबाद भेट

पंतप्रधान हैदराबाद येथील नागरी हवाई वाहतूक संशोधन संस्था (CARO) केंद्राचे राष्ट्रार्पण करतील. नागरी उड्डाण क्षेत्रातील संशोधन आणि विकास (R&D) क्रियान्वयानमध्ये संशोधन आणि विकास करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हैदराबाद मध्ये बेगमपेट विमानतळ येथे त्याची स्थापना केली आहे. यामागे, स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यासाठी आंतर केंद्रीय आणि सहयोगी संशोधनाद्वारे विमानचालन समुदायासाठी जागतिक संशोधन मंच प्रदान करण्याचा हेतू आहे. 350 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेली, ही अत्याधुनिक सुविधा पंचतारांकित गृह मानांकन आणि उर्जा संवर्धन बांधणी बिल्डिंग संहिता (ECBC) नियमांचे पालन करते.

भविष्यातील संशोधन आणि विकास उपक्रमांना पाठींबा देण्यासाठी CARO सर्वसमावेशक प्रयोगशाळा क्षमतांचा वापर करेल. हे क्रियान्वयन विश्लेषण आणि कार्यप्रदर्शन मापनासाठी माहिती संकलन विश्लेषण क्षमतांचादेखील लाभ घेईल. CARO मधील प्राथमिक R&D क्रियान्वयनामध्ये इतर घटकांसह हवाई क्षेत्र आणि विमानतळ संबंधित सुरक्षा, क्षमता आणि कार्यक्षमता सुधारणा कार्यक्रम, प्रमुख हवाई क्षेत्र आव्हाने, विमानतळ पायाभूत सुविधांच्या आव्हानांचा शोध, भविष्यातील हवाई क्षेत्र आणि विमानतळ गरजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करणे या बाबींचा समावेश असेल

संगारेड्डी इथे पंतप्रधानांचे कार्यक्रम

पंतप्रधान 6,800 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  या प्रकल्पांमध्ये, रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या बहुविध प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधान, तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये, NH-161च्या कांडी ते रामसनपल्ले या 40 किमी लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. हा प्रकल्प, इंदूर-हैदराबाद आर्थिक पट्ट्याचा (इकॉनॉमिक कॉरिडॉर) एक भाग आहे आणि यामुळे तेलंगण, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशदरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक अखंड तसेच  सुलभ होईल. या टप्प्यामुळे हैदराबाद आणि नांदेडदरम्यानचा प्रवासाचा वेळही जवळपास 3 तासांनी कमी होईल. NH-167च्या मिर्यालागुडा ते कोडाड भागातील 47 किमी लांबीच्या टप्प्याच्या, पेव्हर ब्लॉक बसवलेल्या अतिरिक्त भागासह दुपदरीकरणाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. दळणवळण व्यवस्थेतील या सुधारणेमुळे, या प्रदेशातील पर्यटन तसेच आर्थिक उलाढाल आणि उद्योगांना चालना मिळेल.

पुढे, पंतप्रधान NH-65च्या पुणे-हैदराबाद विभागाच्या 29 किमी लांबीच्या सहा पदरीकरणासाठी पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे तेलंगणातील प्रमुख औद्योगिक केंद्रांनाही, पतनचेरूजवळील पशाम्यलाराम औद्योगिक क्षेत्राप्रमाणे सुधारीत दळणवळण व्यवस्था मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, रेल्वेस्थानकाच्या सहा नवीन  इमारतींसह सनथनगर-मौला अली रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे उद्घाटन करतील. प्रकल्पाचा संपूर्ण 22 किलोमीटर लांब मार्ग, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेसह कार्यान्वित करण्यात आला आहे आणि MMTS (मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस) टप्पा-II प्रकल्पाचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, फिरोजगुडा, सुचित्रा सेंटर, भूदेवी नगर, अम्मुगुडा, नेरेडमेट आणि मौला अली हाऊसिंग बोर्ड या सहा रेल्वे स्थानकांवर नवीन इमारती उभ्या राहिल्या आहेत. दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या विभागात प्रथमच, प्रवासी गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे इतर मोठ्या प्रमाणात क्षमता पूर्ण झालेल्या विभागांवरील भार कमी होऊन या प्रदेशातील गाड्यांचा वक्तशीरपणा आणि एकूण गती सुधारण्यास मदत होईल.

मौला अली-सनथनगर मार्गे घाटकेसर-लिंगमपल्ली या MMTS रेल्वे सेवेलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वे सेवेमुळे, हैदराबाद-सिकंदराबाद या जुळ्या शहरांमधील लोकप्रिय उपनगरीय रेल्वेसेवेचा विस्तार, पहिल्यांदाच नवीन भागात होत आहे. यामुळे चेर्लापल्ली, मौला अली यांसारख्या, शहराच्या पूर्व भागातील नवीन क्षेत्रांना, जुळ्या शहरांच्या प्रदेशातील पश्चिम भागाशी जोडणे शक्य झाले आहे. पूर्व भागाला जुळ्या शहरांच्या प्रदेशातील पश्चिम भागाशी जोडणारा सुरक्षित, जलद आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

पुढे, पंतप्रधान इंडियन ऑइल पारादीप-हैदराबाद उत्पादन वाहिनीचे उद्घाटन करतील.  4.5 MMTPA क्षमतेची 1212 किमी लांबीची ही वाहिनी,  ओदिशा (329 किमी), आंध्र प्रदेश (723 किमी) आणि तेलंगणा (160 किमी) या राज्यांमधून जाते. या वाहिनीमुळे, पेट्रोलियम उत्पादनाची, पारादीप तेलशुद्धीकरण प्रकल्प ते विशाखापट्टणम, अच्युतापुरम आणि विजयवाडा (आंध्र प्रदेशातील) आणि हैदराबादजवळील मलकापूर (तेलंगणामधील) येथील वितरण केंद्रांपर्यंत, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक शक्य होईल.

कल्पक्कममध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील ऐतिहासिक असा मैलाचा दगड म्हणून ठरणाऱ्या, कल्पक्कम, तामिळनाडू इथल्या 500 मेगावॅट क्षमतेच्या भारताच्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या (PFBR) कोर लोडिंगचा (अणुभट्टीत इंधन भरण्याची प्रक्रिया) प्रारंभ, पंतप्रधानांच्या हस्ते  होईल.  हा PFBR,  BHAVINI (भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड)ने विकसित केला आहे.

अणुभट्टीच्या गाभ्यामध्ये कंट्रोल सब असेम्बली, ब्लँकेट सब असेम्ब्ली आणि इंधन सब असेम्ब्ली, असे यंत्राचे भाग असतात. कोर लोडिंग प्रक्रियेमध्ये, अणुभट्टी नियामक उप-असेंबली जोडणे, त्यानंतर ब्लँकेट सब-असेंबली आणि इंधन उप-असेंबली जोडणे यांचा समावेश होतो. यातूनच मग वीजनिर्मिती होते.

भारताने इंधनाचा पुनर्वापर करता येईल अशा व्यवस्थेसह तीन टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम स्वीकारला आहे.  PFBR हा आण्विक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आहे, ज्यात, पहिल्या टप्प्यात वापरलेल्या इंधनावर पुनर्प्रक्रिया करुन ते FBR मध्ये इंधन म्हणून वापरले जाते. या सोडियम शीतनक (थंड करणारा घटक) म्हणून वापरलेल्या पीएफबीआरचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते वापरलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन, तयार करू शकते. यामुळे, भविष्यातील जलद अणुभट्ट्यांसाठी इंधन पुरवठ्यामध्ये स्वावलंबन साध्य करण्यात मदत होईल.

अणुभट्टीतून निर्माण होणारा कमीतकमी आण्विक कचरा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह, फास्ट ब्रिडर रिॲक्टर सुरक्षित, कार्यक्षम आणि स्वच्छ उर्जेचा स्रोत प्रदान करतील तसेच निव्वळ शून्याचे  उद्दिष्ट साध्य करण्यात योगदान देतील. अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात थोरियमच्या वापराच्या दिशेने भारताचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. ही भट्टी कार्यान्वित झाल्यावर व्यावसायिक दृष्ट्या कार्यरत जलद अणुभट्टी असणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश असेल.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content