भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘समुद्र प्रहरी’ एक विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज असून ते सध्या 11 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 दरम्यान आसियान देशांना भेट देणार आहे. ही भेट सागरी प्रदूषण प्रतिसादासाठी भारताच्या आसियान उपक्रमाचा एक भाग असून भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण प्रतिसाद क्षमतांचे प्रदर्शन करते तसेच सागरी प्रदूषण समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आसियान प्रदेशातील क्षमता वाढवण्याची त्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

हे जहाज चेतक हेलिकॉप्टरने सुसज्ज असल्यामुळे त्याची या प्रदेशातील प्रदूषण रोखण्याची क्षमता वर्धित झाली आहे. या उपक्रमाची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये कंबोडियामध्ये झालेल्या आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत केली होती.

या प्रवासादरम्यान हे जहाज बँकॉक, हो ची मिन्ह आणि जकार्ता या बंदरांना भेट देणार आहे. ही भेट भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण नियंत्रण क्षमता आणि सागरी प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने सहयोगी प्रयत्नांसाठीचे समर्पण दर्शवते.
विदेशी आदानप्रदान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, “पुनीत सागर अभियान” मध्ये सहभागी होण्यासाठी या जहाजावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) 13 कॅडेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे. हे कॅडेट्स या आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत भागीदार राष्ट्रांच्या समन्वयाने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील.

या भेटीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण, क्रॉस-डेक भेटी, नियोजन आणि टेबलटॉप उपक्रम, संयुक्त कवायती, तसेच क्षमता-निर्माण सुविधांच्या भेटीसह अधिकृत आणि सामाजिक भेटींचा समावेश आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे जहाज (ICGS) समुद्र प्रहरीची आसियान देशांची भेट, सागरी सहकार्याद्वारे मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याच्या भारताच्या निरंतर प्रयत्नांना बळ देते.

