Wednesday, July 3, 2024
Homeमाय व्हॉईसराजकारण की समाजकारण...

राजकारण की समाजकारण म्हणजे अंडे पहिले की कोंबडी?

खरेतर हा सनातन प्रश्न आहे राजकारण की समाजकारण? महाराष्ट्रात हा प्रश्न घेऊन लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर समोरासमोर उभे ठाकले होते. यापासून तो अगदी आज, आतापर्यंत राजकारणानेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ”the darkest places in hell are reserved for those who maintain in their neutrality in time of moral crises”.  म्हणजे थोडक्यात आपल्या ‘नारो वा कुंजरोवा’सारखे!!

मलाही हा प्रश्न काही वर्षांपूर्वी पडत असे. वाटत असे की राजकारण फार होतंय. काही प्रमाणात समाजाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कालांतराने लक्षात आले की समाजकारणाचा मार्गही राजकारणाच्या मार्गावरूनच जातो. इतक्या या दोन्ही गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. आपल्याकडील राजकीय व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेमुळेही असे मत झाले असावे. असं वाटतंय यासंदर्भात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या एका पत्राचा हवाला देऊन विचारवन्त य. दि. फडके आपल्या एका प्रस्तावनेत म्हणतात.. खरा मतभेद पॉलिटिक्स या संकल्पनेबद्दल आहे. राजकारण करणे ही विशिष्ट क्रिया खरी पण या क्रियेतून साधायचे काय असते? हा खरा मतभेदाचा प्रश्न आहे. टिळक म्हणतात- ‘राजकारण संतांसाठी नाही, सामान्य व्यवहारी लोकांसाठी आहे’ हे म्हणणे पटणारे आहे. मग पुढचा प्रश्न येतो की, व्यवहारात सामान्य लोकांनी साध्य काय मानावे?

राजकारणात लोकांपुढे (संतांपुढे नव्हे) साध्य काय असावे? या प्रश्नावर टिळकांनी पत्रात न दिलेले उत्तर असे संभवते की, सत्ता व सामर्थ्य याच गोष्टी राजकारणापुरत्या अंतिम साध्य मानाव्यात.. पुढे य. दि. म्हणतात- सामर्थ्य व सत्ता हीच राजकारणाची अंतिम साध्ये आहेत, असे टिळकांचे मत असावे. य. दि. पुढे म्हणतात- स्पर्धात्मक जीवनाच्या संकल्पनेवर गांधीजींचा आक्षेप आहे. त्यांच्या मते व्यवहार हा साधुत्वावर आधारता येत नाही. हल्ली गांधीजींच्या मनातले साधुत्व समाजाच्याच मनात नाही तर समाजाचा भाग असलेल्या राजकीय नेत्यांच्या मनात कसा बरे असेल?

देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली असली तरी गेल्या 50 वर्षांत समाज झपाटयाने बदलला आहे. विशेषतः गेल्या 30 वर्षांत तर समाज आणि राजकारणातील बदल न काळण्याइतपत बदलले आहे. समाजात हरघडी नीतिमत्ता पायदळी तुडवली जात असली तरी आम्हाला राजकीय नेता मात्र नितीवान लागतो. समाजात भिनलेले राजकारण आपल्याला नको असते. चांगली गोष्ट आहे. पण आपल्या घरातील वा सोसायटीतील पाणी अचानक बंद झाले वा आलेच नाही तर आपल्या सुशिक्षित समाजाला नेमकी तक्रार कोणाकडे करायची याची साधी माहिती नसते. तो सहज म्हणतो अरे नगरसेवकाला फोन करा रे! असा फोन करण्यात गैर काही नाही. पण जेव्हा आपण सकाळ-संध्याकाळ राजकीय नेत्यांच्या नावे खडे फोडत असताना संकटाच्या वेळी त्यांचीच आठवण काढणे योग्य ठरते का? अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण त्याची जंत्री देऊन सर्वाना बोअर करू इच्छित नाही.

बाळासाहेब ठाकरे यांचे हे व्यंगचित्र आजही तंतोतंत लागू होते..

”कळप करून ब्रह्मांडात हंबरत हिंडलो नाही

स्वतःलाच रचित गेलो; ही सवय गेलीच नाही”

या ताकदीची माणसे आता मिळणारच नाहीत. कारण..

”असे आम्ही लक्षावधी नारीनर दिवस असेतो वावरतो

राबता, खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेतो”

अशी आजूबाजूची परिस्थिती असताना न सुटलेले अनेक प्रश्न, समस्या सुटण्यासाठी कोणाचातरी आधार लागतो. तो मानसिक का असेना. तो सामान्यांना राजकारणात दिसतो. सर्व प्रश्न समस्या सुटल्या नसतीलही. त्या सुटण्यास अजून दशके लागतील हे मनाला माहीत असूनही सर्वच जण राजकारणाच्या आश्रयालाच जातात. आपल्याला फक्त वाईट राजकारणीच आठवत राहतात. चांगले राजकारणीही आहेत. भले त्यांची संख्या अतिशय कमी आहे. समाज तरी कुठे हो सगळा चांगला आहे. ”politicians are the same allover they promises to build a bridge even where there is no river” असं जरी खरे असले तरी समाज जागरूक असेल तर जनतेला गंडा घालणारे राजकीय नेतृत्त्व पुढेच येणार नाही हे ही तितकेच लक्षात ठेवले पाहिजे.

”हे करुणाकरा

आमच्यासाठी स्वतःला कृसावर चढवून घेतलंस

शब्द फिरवले नाहीस एकेक खिळा ठोकला जातानाही

उलट उद्गारलास क्षमा कर त्यांना

त्यांना कळत नाही ते काय करतायत”

असा मासिहा येईल की नाही हे तुमच्याप्रमाणे मलाही माहीत नाही. एक मात्र खरे आहे की, हल्ली प्रमाणापेक्षा राजकारण थोडे जास्त होत आहे. विरोधी पक्ष म्हणतात राजकारण केले जात आहे तर सत्ताधारी तितक्याच मोठ्या आवाजात सांगत आहेत की विरोधकांनी राजकीय चष्मा लावला आहे. परराज्यातील मजूर सोडण्यात व न सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्या, लाखो-कोटी रुपयांची पॅकेजस, आत्मनिर्भर बना म्हणून सांगायचे आणि आपल्या समोर तर सकाळ-संध्याकाळ बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिराती दिमाखाने झळकत आहेत. परस्परविरोधी टोके आहेत आणि या परस्परविरोधातूनच मार्ग काढायचा आहे. बघूया ही कसरत कशी काय जमते ते..

Continue reading

आता न्यायमूर्तींनीच रेल्वेला प्रवाशांच्या ने-आणीचे प्रशिक्षण द्यावे!

गेले काही दिवस या ना त्या कारणाने रेल्वे खाते चर्चेतच आहे. कधी लोकल गाडीतून खाली पडून प्रवाशाचा मृत्यू, तर कधी रेल्वे गाड्यांची टक्कर, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड म्हणून टाइमटेबल कोलमडले.. आदी अनेक कारणांमुळे रेल्वे बातम्यात असतेच असते! कोणी कितीही...

मुंबईत झुळूझुळू नदी वाहते.. पण गुळगुळीत कागदावर!

गेले सतत दोन आठवडे मी मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात येणाऱ्या व पहिल्या पानावर विराजमान होणाऱ्या चिकन्याचुपड्या भाषेत लिहिलेल्या तसेच छायाचित्रांनी नटलेल्या भरगच्च जाहिराती पाहत होतो. कालच्या शनिवारी तर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिली चक्क पूर्ण दहा पाने निवासी संकुलांच्या जाहिरातीनी नटवलेली...

चला.. राजकीय प्रदूषणाचा भिकार खेळ संपला!

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी शब्दांची 'होळी' वा 'शिमगा' साजरा केला होता. केवळ शब्दच कानावर पडत होते...
error: Content is protected !!