मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पेणच्या हनुमान व्यायामशाळेत सराव करणाऱ्या रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी गटासाठी झाली होती. या स्पर्धेत ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू रमेश खरे यांनी एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. स्कॉट या प्रकारात 60 किलो, बेंच प्रेस प्रकारात 55 किलो आणि डेडलिफ्ट प्रकारात 90 किलो असे एकूण 205 किलो वजन त्यांनी उचलले. त्याबद्दल त्यांना गटातून पहिले आणि इतर प्रकारातीलही पहिले अशी एकूण चार सुवर्णपदके मिळाली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हेड मेकॅनिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले रमेश खरे हनुमान जिमचे संचालक, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग पदकविजेते दाम्पत्य “राजेश अंनगत”आणि “मयुरा अंनगत” यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच खरे शरीरसौष्ठव पंच असून रायगड संघटनेवर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, उपाध्यक्ष सुभाष भाटे (महाड), सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप पाटकर, सुभाष टेंबे (माणगाव), दत्तात्रय मोरे (कर्जत), कार्याध्यक्ष यशवंत मोकल, माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे. रमेश खरे यांनी या वयात सुवर्णपदक प्राप्त करून एक प्रेरणादायी आदर्श रायगड जिल्ह्यातील आजच्या तरुण पिढीला दिला आहे, असे मत संजय सरदेसाई (सचिव, महाराष्ट्र राज्य असोसिएशन) यांनी व्यक्त केले.