संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच तेथे आलेले होते. आम्ही पाणी पिऊन ताजेतवाने होईस्तो ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आमच्यात सामील झाला. येत्या महिन्यात तो पुढारीमधून निवृत्त होणार असल्याचे त्यानेच सांगितले. तोवर मंदार पारकर यांनी पुढे येऊन स्वागत केले. त्याआधी मी पारकर यांना मेसेंजरवर एका बातमीसंदर्भात चर्चा केल्याची आठवण करून दिली. ते परळचे आहेत असे समजल्यावर दादर पूर्वच्या दादासाहेब फाळके मार्गांवरील फेरीवाल्यांच्या त्रासाबद्दल थोडी चर्चा झाली. या चर्चेमुळे मी २५/३० वर्षे मागे गेलो. त्यावेळी प्रेसरूममध्ये आल्यावर प्रथम मंत्री व सचिवांच्या दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेवर जात असे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दिवसभराचा कार्यक्रम त्यात असायचा. अन्य मंत्र्यांचाही कार्यक्रम असे. मुख्य सचिव कोणाला भेटणार आहेत, कोणता अहवाल सादर होणार आहे, शेतीच्या स्थितीविषयी कोण बोलणार आहे, अशी विविध कार्यक्रमांची पत्रिका असे. एखादा वादळी अहवाल सादर होणार असेल तर त्याआधी फिल्डिंग लावली जात असे. शरद पवार यांना पत्रकारांना माहिती द्यायची नसेल तर चक्क ‘माईंड युअर बिझिनेस’ म्हणून ते पत्रकारांना वाटेला लावत असत. टिळेधारी वाघ यांच्या गैरप्रकाराविषयीचा अहवाल आल्यानंतर अहवाल तर संपूर्ण दाखवला गेला. त्यात आम्ही मंत्री / आमदारांची नावेही पाहिली. मात्र ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगितल्याने बातमी कळते-समजते, अशी द्यावी लागली. अंतुले, वसंतदादा, विलास सावंत, छगन भुजबळ, आर आर आबा, विलासराव, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे आदी अनेकजण पत्रकारस्नेही नेते होते.

गतकाळातून बाहेर आल्यावर काहींना मी परळ-लालबाग विभागातील जुन्या इमारतीच्या पुनर्वीकासबाबत काही विचारले. सर्वांनी या सर्व प्रकल्पला बराच उशीर होत असल्याचे मान्य केले. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच जबाबदार असल्याचे काहींनी सांगितले. ही चर्चा सुरु असतानाच लोकमतचे हुकमी पान समजले जाणारे यदु जोशी यांचे आगमन झाले आणि चर्चेत अजून जान आली. तशी थोडी जान उदयने घातलीच हॊती. उदय म्हणजे वार्ताहर संघाचा चालताबोलता शब्दकोशच आहे जणू! मुख्यमंत्र्यांपासून तो राज्यमंत्री / उपमंत्री तसेच सचिव उपसचिव म्हणू नका, त्याच्या जिभेवर वा त्याच्या मोबाईलमध्ये सर्व काही हजर असते. आणि ही माहिती केवळ स्वतःसाठी नाही तर त्याची मुक्त उधळण तो करत असतो. माहितीविना कुणाचे अडू नये हाच त्याचा हेतू असतो. योगेश नाईक, विवेक भावसार आदींनी या हलक्याफुलक्या चर्चेत भाग घेऊन मला काहीसे अपडेट केले.
प्रेसरूममधून नवीन ऊर्जा घेऊन सुमारे दोन-अडीच तासांनी आम्ही बाहेर पडलो. मंत्रालयाबाहेर आल्यानंतर मी, उदय व राम मेट्रो सिनेमानजिकच्या कयानीकडे निघालो. पण कयानी संध्याकाळी सहा वाजताच बंद झाले असल्याने केक व पानीकमचा बेत रद्द होईल असे वाटले हॊते. पण तो उदय होता. हार न मानता त्याने गाडी ठाकुरद्वारकडे नेण्यास सांगितली. रस्त्यात उतरल्यावर आणखी एक आश्चर्य आमची वाट पाहत होते. ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबारीश मिश्र! किती वर्षांनी भेटत होतोआम्ही. मग मी, उदय,अंबरीश व राम यांनी विनयमध्ये मराठी पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला…