मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. पालिकेकडून लवकरच भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली / ऍप्लिकेशन उद्या, शनिवार १९ जुलै २०२५पासून पालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी, ‘अर्ज करा’ या सदरात उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने खालील सुविधा उपलब्ध
- निधन झालेल्या / मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
- स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे.
- नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.
- अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांकरिता प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाईल. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचा-यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल.
नागरिकांना ऑनलाईन सुविधेबरोबरच, प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच स्मशानभूमी / दफनभूमी येथे अंत्यसंस्काराची नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधादेखील उपलब्ध असेल, असे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.