मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
बीड जिल्ह्यात घरात माणसं असताना बाहेरून घर पेटवून देण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचे सर्व व्हिडिओ मिळाले असून 50 ते 55 जणांना ओळखण्यात आले आहे. या सर्वांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घरे जाळणे किंवा मालमत्ता जाळणे असे प्रकार पोलीस खपवून घेणार नाहीत. जिथे शांततेत आंदोलन चालू आहे तेथे पोलीस त्यांना विरोध करणार नाहीत. मात्र जिथे हिंसाचार होईल तेथे पोलीस कडक कारवाई करतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
काही लोक या आंदोलनाचा फायदा घेत हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये काही हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठान पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि याची गंभीर दखल गृह विभागाने तसेच पोलिसांनी घेतली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. या कार्यकर्त्यांच्या सहभागाची खात्री पटल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.