ट्रान्सफॉर्मर म्हणजेच रोहित्र जळले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
रोहित्र जळल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत बिघडलेले रोहित्र बदलले जात आहे. तथापि, नादुरुस्त रोहित्राबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी महावितरण ॲपच्या माध्यमातून त्वरित माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
जळलेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे, असे विविध उपाय केले आहेत. रोहित्र बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर रोज घेण्यात येत आहे. या मोहिमेला यश आले असून महावितरणला रोहित्र बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात रोहित्र बदलण्यात येत आहे. तथापि, रोहित्र जळले आहे, हेच उशिराने समजले, तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती त्वरीत महावितरण ॲपवर द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ॲपवरून तक्रार अशी करा
मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा. नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा. ग्राहकाचे नाव नंबर दिसेल. त्यावर क्लिक करा. ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून रोहित्र बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा. संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा. नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा. ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल. ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.