Homeमुंबई स्पेशलआता मुंबईत पाळीव...

आता मुंबईत पाळीव प्राण्यांचा होणार सन्मानपूर्वक अंत्यविधी!

लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मुंबईतल्या मालाडमध्ये उपलब्ध करुन देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने दयाभाव जोपासला आहे. नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणीमित्र आणि नागरिकांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड (पश्चिम)मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरकदेखील आहे. ही सुविधा वापरासाठी खुली करण्याचा छोटेखानी सोहळा आज मालाड येथे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडला. या सुविधेचा उपयोग करतानाच लोकसहभागातून ती उत्तमोत्तम करण्याचेही आवाहन करताना मुंबईच्या अशा अभिनव नागरी सेवांचे आणि पुढाकाराचे देश पातळीवर अनुकरण करण्यात येईल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

पालिकेचे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त शैलेश पेठे, सहायक महाव्यवस्थापक डॉ. सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. योगेश वानखेडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राठोड यांच्यासह विविध प्राणीमित्र संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सदर पाळीव प्राणी दहन सुविधेसाठी पुढाकार घेणारे पशुवैद्यकीय विभागाचे तत्कालीन प्रमुख दिवंगत डॉ. योगेश शेट्ये यांच्या कुटुंबियांचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याप्रसंगी सत्कार केला. तसेच उपस्थित प्राणीमित्र संघटनांच्या प्रतिनिधींचाही पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती उपायुक्त कबरे यांनी यावेळी दिली.

अनेक वर्षांपासून प्राणीमित्रांकडून मृत प्राण्यांसाठी शास्त्रोक्त दहन सुविधेसाठी मागणी होत होती. त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे. या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरुपात वायू पुरवठ्याची सुविधा महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागार (मॉर्च्युरी)देखील उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. पठाण यांनी सांगितले.

ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणीप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येईल. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. सदर दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल व प्रचालन व्यवस्था मे. अनिथा टेस्ककॉट इंडिया प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या दहन व्यवस्थेची क्षमता ही ५० किलो प्रतितास एवढी आहे. या दहन व्यवस्थेच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८८७३८-८७३६४ असा आहे. प्राणी दहन करण्यासाठी पालिकेचे किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. पाळीव प्राणी (श्वान) असल्यास मुंबई महापालिकेची श्वान अनुज्ञाप्ती आवश्यक आहे. नागरिकांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड / पॅनकार्ड / वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स) / रेशनकार्ड यापैकी एक व पत्त्याच्या पुराव्यासाठी पारपत्र (पासपोर्ट) / वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स) / वीज देयक / पाणी देयक यापैकी एक सादर करणे आवश्यक आहे. प्राणीप्रेमी असतील तर भारतीय जीवजंतू मंडळाने दिलेले कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल, असे सहायक आयुक्त दिघावकर यांनी सांगितले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content