Thursday, December 12, 2024
Homeमुंबई स्पेशलआता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक...

आता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवार होणार आनंददायी!

विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

आनंददायी

उपक्रमाचा उद्देश

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आनंददायी शनिवार, या उपक्रमामध्ये प्राणायाम, योग, ध्यान-धारणा, श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्तेसुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावर आधारित उपक्रम माईंडफुलनेसवर आधारित कृती व उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आदी कृतींचा समावेश असेल. या कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे.

आनंददायी शनिवार, हा उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार वरील कार्यपद्धतींद्वारे आनंददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक यांच्यामार्फत एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content