खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणार्या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे या नोटा नसतात. गेली दोन वर्षेतर बँकेतदेखील या नोटा मिळत नव्हत्या. मग दोन हजाराच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे, तो बाहेर पडण्याकरता सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
१९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत व नंतरही या नोटा चालतील असे सांगण्यात आले. पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले त्याच्या दुसर्या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपद्धतीने यावेळीही करता आले असते आणि त्यातून काळा पैसा चलनामध्ये फिरण्यापासून वाचवता आला असता, असेही ते म्हणाले.
आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्याच्या करारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी नवाब मलिक यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्याच आरोपांची चौकशी आज सीबीआय करत आहे. ते अधिकारी फार स्वच्छ आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता मात्र लोकांसमोर सीबीआयनेच सत्य समोर आणले आहे, असेही पवार म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मीसुद्धा त्यावेळी उपस्थित राहणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय व राज्याच्या यंत्रणांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पुरवण्या मागण्यांच्यावेळी सत्ताधारी आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डवर आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्रीपदे उपभोगल्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर पुण्यात एका माजी मंत्र्यांनी आम्हाला आता शांत झोप लागते, असे सांगितले. तीच गोष्ट एका खासदाराने सांगलीत सांगितली तर एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग मशीन आहे, असे वक्तव्य केले होते. द्वेषभावनेतून, राजकीय सूडबुध्दीने कुणाला अशा तपासयंत्रणांकडून बोलावले जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.
जेव्हाकेव्हा आमच्या नेत्यांना तपासयंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले तेव्हातेव्हा आपण कोणालाही माहिती घेण्यासाठी फोन केला नाही. छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक… कधीच कुणाला फोन केला नाही. जयंत पाटील यांनाही नाही. फोन कशासाठी करायचा, प्रत्यक्ष भेटीतच माहिती घेईन, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी कायम एकजुटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता जागावाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

