Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांना पालिकेची नववर्षाची...

मुंबईकरांना पालिकेची नववर्षाची भेट, पोहण्याचा आनंद घ्या मनमुराद!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४ तरण तलावांसाठी आता सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा निर्णय घेऊन महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना नववर्षाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४ तरण तलावांसाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते. मात्र, आता पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार जलतरण तलावविषयक सभासदत्व प्रक्रिया आणि संबंधित कार्यपद्धती यात सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. याच सुधारणांचा भाग म्हणून आता सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा मार्गही पालिका प्रशासनाने खुला केला आहे.

त्याचबरोबर सदस्यत्व असलेल्या सभासदाला त्याच्यासोबत एका पाहुण्यालादेखील पोहण्यास नेता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी अग्रीम स्वरुपात दैनिक शुल्क भरणे आवश्यक असेल. तसेच ज्यांना सदस्यत्व मिळू शकणार नाही, अशा इच्छुकांसाठी ऑनलाईन प्रतीक्षायादीचा पर्यायदेखील आता खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या तरण तलावात एका विशिष्ट वेळी उपस्थित असणाऱ्या सभासदांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘लाईव्ह डॅशबोर्ड’देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील ४ जलतरण तलावांचे सभासदत्व घेण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने पालिकेने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रणाली विकसित करून २३ ऑगस्ट २०२२पासून नागरिकांसाठी खुली केली होती. जलतरण तलावांच्या सदस्यत्वासाठी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद लक्षात घेऊन आता सदर सुविधा अधिक व्यापक करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षात ०३ जानेवारी २०२३पासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येत आहे.

या सभासद नोंदणी प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

१. https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या वेब पेजवर अत्यंत सोपा व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज आहे. हा अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

२. वरीलनुसार अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. हे ऑनलाईन शुल्क वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि दैनंदिन या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. तरण तलावाच्या आकारानुसार वेगवेगळी शुल्करचना असून या अंतर्गत वार्षिक शुल्क रुपये ८,०००/- ते रुपये १०,०००/- इतके आहे. तर त्रैमासिक शुल्क रुपये २,२३०/- ते रुपये २,९००/- इतके आहे. मासिक शुल्क रुपये १,३०० इतके असून सभासदासोबत येणाऱ्या पाहुण्यांसाठी दैनिक शुल्क रुपये २४०/- इतके आहे. 

३. वरीलनुसार ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर निर्धारित कालावधीत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड व शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय (Active) केले जाणार आहे. 

४. वार्षिक सभासदत्व उपलब्ध नसल्यास प्रतीक्षायादीचा पर्याय असणार आहे. रुपये ५००/- इतके शुल्क भरून प्रतीक्षायादीत नाव नोंदविता येईल. तसेच प्रतीक्षायादीतून नाव कमी करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

५. वार्षिक सभासदत्व प्राप्त झालेल्या व्यक्तिला काही कारणास्तव सभासदत्व नको असल्यास, ते परत करण्याची सुविधादेखील आता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर सभासदत्व नूतनीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधादेखील आता कार्यान्वित करण्यात आली आहे.

 ६. प्रत्येक सभासदाला त्याच्या सभासदत्वाचा तपशील पाहण्यासाठी स्वतंत्र लॉग-इन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

७. सर्व तरण तलावांच्या वेळा सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ६.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत असेल. महिला सभासदांसाठी राखीव सत्र सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० आणि सायंकाळी ५.०० ते ६.०० अशी असेल. सत्र पद्धत बंद करण्यात आली असून सभासद तरण तलावांच्या वेळांमध्ये तरण तलावाच्या क्षमतेनुसार केव्हाही येऊ शकतो. 

८. सभासदांसाठी असलेली पूर्वीची ४५ मिनिटांची वेळ वाढवून ६० मिनिटे करण्यात आली आहे. सभासदाने ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा सभासदत्व कालावधी गुणोत्तर प्रमाणात कमी करण्यात येईल. सभासदाला त्याच्या पाहुण्यांसाठी ऑनलाईन तिकिट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. 

९. प्रासंगिक तत्त्वावर तरण तलाव सुविधा वापरणाऱ्या अभ्यागतांसाठी विशेष नोंदणी सुविधा असेल. दुपारी १.०० ते ४.०० ह्या कालावधीत संपूर्ण तरण तलाव आरक्षित करण्याची सुविधा असणार असून यासाठी प्रति तास रुपये २०,४३०/- इतके शुल्क असणार आहे. 

१०. यापूर्वी सभासदत्वाची क्षमता पूर्ण झाल्याने थांबविण्यात आलेली सभासद नोंदणी प्रक्रिया ३ जानेवारी २०२३पासून पुनश्च सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत दादर पश्चिम परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ७०० वार्षिक सभासद व ८२५ त्रैमासिक सभासद, चेंबूर पूर्व परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ३५० वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद, दहिसर पूर्व परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव यासाठी ३३० वार्षिक सभासद व २७५ त्रैमासिक सभासद आणि कांदिवली पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी २,१७८ वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद इतक्या ऑनलाईन सभासदत्वासाठी नोंदणी प्रक्रिया ३ जानेवारी २०२३पासून सुरू होणार आहे. 

११. वरील व्यतिरिक्त मुंबई महापालिकेतर्फे दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या ७ ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. सदर कार्य पूर्ण झाल्यानंतर व लोकार्पण झाल्यानंतर तेथील सभासद नोंदणी प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही पालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content