नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे. नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणीशी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते. ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल. ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे स्थापना केली. यानिमित्ताने त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.
प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे. भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेली ही भेट आहे. नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे. नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते. देशात आता नवी उर्जा, नवा जोम, नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होत आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा, नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे. सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन याकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

भारत हा फक्त लोकशाहीवादी देश नाही तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीसाठी राष्ट्र हा मूलभूत पाया आहे. भारतात लोकशाही ही फक्त एक व्यवस्था, प्रणाली म्हणून रूजलेली नाही तर ती संस्कृती, विचारप्रक्रिया आणि परंपरा आहे. वेद आपल्याला लोकशाही सभा आणि समित्यांची तत्त्वांची शिकवण देतात. महाभारतात प्रजासत्ताकाचे वर्णन सापडते आणि वैशालीत भारत लोकशाही जगला आणि तिथे भारताने लोकशाही अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. भगवान बसवेश्वरांचे अनुभव मंटप्पा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हाच आपला संकल्प आहे. ही प्रेरणा, या संकल्पाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आपली संसद आहे, असे मोदी यांनी सांगितले.
कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, कितीतरी गमावल्यानंतर भारताने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि तो अमृतकालापर्यंत पोहोचला. अमृतकाल म्हणजे आपला वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठण्यासाठीचा काळ आहे. आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता सोडून कलेच्या त्या प्राचीन वैभवाकडे पुन्हा वळला आहे. नवीन संसद भवन हे या प्रयत्नाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला तसेच कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल कमळावर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी केल्याची माहिती पंतप्रधानांनी केली.
ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच, आता समर्पित वृत्तीने काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

