आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल. काँग्रेस जर यासाठी तयार नसेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीरपणे केलेली घोषणा महिन्या- दोन महिन्यांतच निकालात निघाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी केलेल्या संबोधनात शरद पवार यांनी ही घोषणा केली होती. जूनमध्ये झालेल्या या घोषणेला ऑगस्टमध्येच सुरूंग लावण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक याबाबतचा निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्षांविरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतले पक्ष परस्परांशी लढत देतील हे स्पष्ट झाले आहे.

काही ठिकाणी भाजपाचे अस्तित्त्व नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षांची, तीन पक्षांची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले.
दानवेंचे मंत्रीपद फक्त बोलण्यासाठी..
मोदीसाहेबांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत.. राज्यमंत्र्यांना किती अधिकार.. व कितीजण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही, ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत.. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही असा टोला त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.
१५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आला नाही अशी टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर बोलताना मलिक म्हणाले की, रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे.
हेही वाचा – २८ डिसेंबरला सोनिया व राहुल गांधी शिवाजी पार्कवर!

