राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू असलेल्या शिबिरात यंदा सहभागी होणाऱ्या 2,361 कॅडेट्सपैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग वाढला आहे. इतकेच नव्हे तर युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले 135 छात्रही यात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिरात 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्ट. जनरल गुरबीरपाल सिंग यांनी काल दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले सुमारे 135 छात्र शिबिरात भाग घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात एनसीसी कॅडेट्सची संख्याही 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली असून त्यात 40% मुली आहेत, असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी नमूद केले.
या शिबिरात सहभागी होणारे छात्र अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणविषयक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे तसेच छात्रांच्या वैयक्तिक गुणांना अधिक वाव देऊन त्यांची मूल्यप्रणाली बळकट करणे हा या शिबिराचा हेतू आहे. उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासह अनेक मान्यवर या शिबिराला भेट देणार आहेत. 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात एनसीसीची ही तुकडीदेखील सहभागी होईल. दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला पंतप्रधानांच्या रॅलीने या उपक्रमांचा समारोप होईल, असेही सिंग यांनी नमूद केले.