नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रो संपर्क सुविधेद्वारे जोडले जाईल तसेच भविष्यात विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गती शक्ती योजनेंतर्गत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत सांगितले. सिंधिया यांनी या विमानतळाच्या सद्यस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
विमानतळ तीन दिशांनी रस्त्यांना जोडलेले असेल. ते रस्ते म्हणजे – राष्ट्रीय महामार्ग 4B (348), सायन पनवेल महामार्ग आणि अटल सेतू. खारघर रेल्वेस्थानकाद्वारे विमानतळ रेल्वेला जोडले जाईल. विमानतळासाठी मेट्रो संपर्क सुविधा उपलब्ध असेल – मेट्रो लाईन 2D: डीएन नगर ते मंडाला-मानखुर्द, मेट्रो लाईन 8: मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई पेंधर- बेलापूर- तळोजा मेट्रो लाईन. भविष्यात कुलाबा येथून हॉवर क्राफ्टद्वारे आणि फेज 2 मध्ये रायगड येथून कार्गोद्वारे विमानतळ जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही, तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानास्पद प्रकल्प आहे, असे उद्गारही सिंधिया यांनी काढले.
अठरा हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या संपर्क सुविधेला फार मोठा फायदा होईल, आणि हा प्रकल्प 5 टप्प्यात राबविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाची भौतिक आणि आर्थिक प्रगती 55-60% पर्यंत पूर्ण झाली आहे, असेही ते म्हणाले. या प्रकल्पाची सुरुवात 2018 मध्ये झाली असून 31 मार्च 2025 पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे एक धावपट्टी, एक टर्मिनल आणि दोन कोटी प्रवासी क्षमता निर्माण केली जाईल. प्रकल्पाच्या 3, 4 आणि 5 टप्प्यात नऊ कोटी पर्यंतच्या वाढीव प्रवासी क्षमतेसह दुसरी धावपट्टी आणि चार टर्मिनल तयार केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले असे विमानतळ असेल ज्याच्या 1600 हेक्टर क्षेत्रात शहराच्या बाजूने आणि हवाई क्षेत्रात दहा किलोमीटर अंतरावर स्वयंचलित प्रवासी वाहतूक होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात शंभर टक्के हरित विमानतळ तयार होत आहे. या विमानतळामुळे देशातील हवाई वाहतूक वाढेल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. देशातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक 2030 पर्यंत 15 कोटींवरून 30 कोटींपर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील सहा वर्षांत देशात 200 हून अधिक विमानतळ निर्माण करण्याचा सरकारचा संकल्पही असल्याचे त्यांनी सांगितले.