केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय- एनएफएससीद्वारे राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धा 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी एनएफएससी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक राज्यांचे प्रतिनिधी सहभाग घेणार असून या स्पर्धेदरम्यान राज्यांच्या अग्निशमन सेवा, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसादात त्यांचे कौशल्य यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
या स्पर्धेत लॅडर ड्रिल, वॉटर टेंडर ड्रिल, टीमवर्क आणि आपत्कालीन परिस्थितीत संसाधन व्यवस्थापनातील आव्हाने यांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड विभागाचे महासंचालक ताज हसन (भारतीय पोलीस सेवा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धेतील कौशल्याचे हे उल्लेखनीय प्रदर्शन पाहण्यासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे शासकीय अधिकारी, अग्निशमन सेवा व्यावसायिक आणि जनतेला आवाहन केल्या जात आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहिती https://nfscnagpur.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.