Wednesday, February 5, 2025
Homeएनसर्कलपंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाशिककरांच्या प्रेमाचा वर्षाव!

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हासित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. पंतप्रधान मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले.

पंतप्रधान

आज सकाळी पंतप्रधानांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून मोदी यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.

नाशिकच्या युवा वर्गाने केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत त्यांचा ताफा तपोवनकडे निघाला. जागोजागी हजारोंच्या संख्येने थांबलेले नाशिककर आपल्या पंतप्रधानाचे स्वागत उत्साहात करत होते.

लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर मोदी यांचे स्वागत करत होती. पंतप्रधानांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. लेझिम पथक, ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भारून गेला होता. हॉटेल मिर्ची ते तपोवनपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर केवळ आणि केवळ अमाप उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे हाती घेत युवकांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविधरंगी वेशभूषा करून नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

ऐतिहासिक काळाराम मंदिरातही गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8व्या अध्यायाचे (श्लोकांचे) (ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content