Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसउद्धव ठाकरेंचे पुन्हा...

उद्धव ठाकरेंचे पुन्हा ‘माझे कुटूंब.. माझी जबाबदारी’!!

कोरोनाने एक नवी म्हण मराठीमध्ये आणली आणि त्याचे श्रेय जाते ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे! ‘माझे कुटूंब.. माझी जबाबदारी’!! म्हणजेच मी आणि माझे फॅमिली मेंबर.. यापलीकडे मी विचार करणार नाही आणि माझा विचार राहणार नाही. तसेच प्रत्येकाने स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करावा. कदाचित स्वतःचा विकास झाला म्हणजे कुटुंबातल्या एका घटकाचा विकास झाला आणि कुटुंबाचा विकास झाला म्हणजेच समाजाच्या एका घटकाचा विकास होतो. पर्यायाने सर्व समाजाचाच विकास होतो अशी धारणा कदाचित उद्धव ठाकरे यांची असावी त्यामुळेच त्यांनी ऐन कोरोनात ही म्हण तयार आणि रूढही केली. त्यांच्याच पक्षाने नुकतीच पुन्हा याची प्रचिती दिली.

शिवसेनेच्या उबाठा गटाने विधानसभेच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जारी केली. यात काँग्रेसची वर्षानुवर्षे बालेकिल्ला असलेली जागा म्हणजेच वांद्रे पूर्व हा मतदारसंघ वरूण सरदेसाईसाठी जाहीर केला. वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मुलाचे मावसबंधू होत. आदित्यच्या आई म्हणजे रश्मीवहिनी यांच्या भगिनीचा मुलगा वरूण सरदेसाई. या उमेदवारीनंतर काँग्रेसने महाविकास आघाडी तोडण्याची भूमिका घेतल्याचे समजते. परस्पर उमेदवार जाहीर करताना महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी प्रत्येक घटक पक्षाने घेतली पाहिजे, हा उद्धव ठाकरे यांचाच सल्ला जर त्यांचे सहकारी मानत नसतील तर आपण त्यांच्यामागे फरफटत का जावे, असा विचार काँग्रेसचे नव्याने तयार झालेले समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी केला असावा. त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला तेव्हा शरद पवारांनी पुन्हा मध्यस्थीची तलवार बाहेर काढली आणि आपल्यासमक्ष काँग्रेस तसेच उबाठा नेत्यांची बैठक बोलावली. त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तेथे उपस्थित होते.

जबाबदारी

या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सर्वांच्या वतीने बोलताना उबाठाचे बोलघेवडे प्रवक्ते संजय राऊत यांनी आमच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगितले. शरद पवार यांच्यासमोर आज अखेरची बैठक झाली. यामध्ये तिन्ही पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना (उबाठा) प्रत्येकी ८५ जागा लढवण्यावर एकमत झाले. एकूण २७० जागा आम्ही तिन्ही पक्ष लढणार आहोत. त्यावर सहमती झाली आहे. उरलेल्या १८ जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी बोलताना त्यांनी आमच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत काही करेक्शन्स करावे लागणार आहेत. चर्चेआधी अशी घाई कोणी केली आणि अशी चूक कशी झाली, हे तपासून पाहिले जाईल आणि त्यात सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या यादीत अशा काही जागा आहेत की ज्या परंपरागत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या आहेत. या जागांवर या दोन्ही पक्षांचा दावा आहे. अशा स्थितीत हे दोन्ही पक्ष या जागा ठाकरेंच्या घशात जाऊ देण्यास तयार नाहीत. परंतु अपमानित होऊन मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा त्या पदावर आरूढ व्हायचे असल्याने जास्तीतजास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात आणि जास्तीतजास्त आपले उमेदवार निवडून यावेत, असा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. याआधीही महाविकास आघाडीने जनतेसमोर जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी आग्रही मागणी करत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होताच. त्यात यश येत नाही असे लक्षात येताच आता त्यांनी ही चाल खेळली. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या या प्रयत्नांना सुरुंगच लावला.

जबाबदारी

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आपल्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. संजय राऊत यांनी या बैठकीचे वर्णन काहीतरी गंभीर घडणार आहे असे करत त्याचे महत्त्व वाढवले. त्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे आणि अनिल परब शरद पवार यांना भेटण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्रावर धावले. त्यांची भेट संपते न संपते तोच संजय राऊत तिथे धडकले. त्यावेळी काँग्रेसचे दिल्लीतले नेते महाराष्ट्राच्या काही नेत्यांसमोर पक्षाची पुढची दिशा आणि व्यूहरचना समजावून सांगत होते. उबाठा गटाने असा आव आणला की जणू काही ते स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याच्या विचारात आहेत. पण काँग्रेसचे नेते सीजन्ड नेते आहेत. त्यांनी असे ५० ठाकरे आपल्या खिशातून ठिकठिकाणी नाचवले आहेत. अगदी १९७५ साली लादलेल्या आणीबाणीच्या काळातही तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणीबाणीचे समर्थन करण्यास भाग पाडले होते. असा इतिहास सांगणाऱ्या काँग्रेसचे नेते मातोश्रीवर चाललेल्या हालचाली बघून गालातल्या गालात हसत नसते तरच नवल. त्यांनीही तशीच आक्रमक भूमिका घेतली आणि उबाठाचे नेते शरद पवार यांनी पॅचअप करावे म्हणून यशवंतराव चव्हाण केंद्रावर जाऊन नाकदुऱ्या काढत राहिले. पुढे पवारांच्याच प्रयत्नांनंतर काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेसाठी नाना पटोलेंच्याऐवजी आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी सोपवली.

शरद पवार कसलेले नेते आहेत. त्यांनी नेमकी संधी साधत ठाकरेंना बळ दिले आणि त्यांनी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसनेही याच यादीवर आक्षेप घेतला आणि ते शरद पवारांच्या चरणी बसले. त्यानंतर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांसमोर त्यांनी ८५-८५-८५ जागांचा तात्पुरता फॉर्म्यूला जाहीर केला. या जागांची बेरीज होते २५५. म्हणजेच ३३ जागांचा तिढा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजून सोडवायचा आहे. परंतु हे चित्र जनतेसमोर जाऊ नये, महाविकास आघाडीचे हसे होऊ नये यासाठी आमचे २७० जागांवर एकमत झाल्याचे राऊत यांनी जाहीर केले आणि महाविकास आघाडीत होणारी बिघाडी टाळण्याकरीता एक पाऊल मागे घेत राऊत यांनी आपल्या यादीत सुधारणा करण्याची घोषणा केली.

जबाबदारी

या जागावाटपात मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. इतकी दानत या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये असती तर संभाजी ब्रिगेडने शिवसेना उबाठाची साथ सोडली नसती. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी परस्पर चार उमेदवार जाहीर केले नसते. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर फारकत घेतली नसती. मातोश्रीवरून उमेदवारी विकली जाते, असा आरोप पूर्वी शिवसेनेत असलेल्या अनेक नेत्यांनी वेळोवेळी केले आहेत. श्रीगोंद्याचे ठाकरे गटाचे नेते राहुल जगताप यांनीही या खेपेला राऊत यांनी श्रीगोंद्याची उमेदवारी विकल्याचा जाहीर आरोप केला आहे. कारण काहीही असो. चर्चेआधीच मतदारसंघ व उमेदवारांची घोषणा करून शिवसेना उबाठाने मातोश्रीचा शिरस्ता राखण्याचा प्रयत्न केला खरा. पण हे अवसान पुढे किती टिकते ते..

या विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याशिवाय महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षापुढे पर्याय नाही. त्यामुळेच आदित्य ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांचे बंधू वरूण सरदेसाई गुरूपुष्यामृताचा मुहूर्त साधण्यास धजावले नाहीत. त्यामुळे सरदेसाईंची उमेदवारी धोक्यात आहे की काय, असा संशय व्यक्त होत आहे. पाहुया.. पुत्रप्रेमानंतर पत्नीचे मन राखण्यात ठाकरे यशस्वी होतात का?

Continue reading

आता शरद पवार आळवताहेत उद्धव ठाकरेंचा राग!

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचू लागला असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा राग आळवायला सुरूवात केली आहे. नुकत्याच केलेल्या एका जाहीर भाषणात थोरल्या पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

राज ठाकरेंच्या सहमतीनेच सदा सरवणकर मैदानात?

मुंबईतला माहीम मतदारसंघ आज सर्वात जास्त चर्चेचा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे तेथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेनेकडून विद्यमान...

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे-पवार राहणार परिवारात दंग!

महाराष्ट्र विधानसभेच्या आता होत असलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे परिवारवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पक्षांचे प्रमुख आपापल्या परिवाराला जपण्यामध्ये कार्यमग्न राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते पक्षाला जपण्यात किती वेळ देतात आणि परिणामी या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारते याकडे...
Skip to content