सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला.
सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या ९९ धावांच्या भागिदारीने जणू सामान्याचा निकालच लावला. साईनाथने २० षटकांमध्ये ३ बाद १५१ अशी चांगली धावसंख्या त्यायोगे उभी केली. मात्र सेजलला तिच्या खेळीच्या सुरुवातीलाच जे जीवदान मिळाले, त्याबद्दल साईनाथने प्रतिस्पर्धी संघाचे अवश्य आभार मानले असतील. श्रावणीने सलामीला येत ५३ चेंडूंमध्ये केवळ ३ चौकार मारत संयमपूर्ण खेळी रचल्याने सेजलला आक्रमणावर भर देता आला. सेजलने ६४ धावा ५४ चेंडूत केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि २ षटकार होते.
स्पोर्टिंगने लक्ष्याचा पाठलाग करताना छान सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या “पॉवर प्ले”मध्ये त्यांनी ४७ धावा केल्या. मात्र त्यांच्या प्रांजल मळेकरला विनाकारण “स्टेप-आऊट” होऊन चेंडू फटकाविण्याचा मोह झाला आणि ती यष्टिचीत झाली. ही चूक फारच महाग ठरली. स्पोर्टिंगने जी लय गमावली त्यानंतर त्यांच्या विजयाच्या आशांना ओहोटी लागली. ध्रुवी पटेल (२६) आणि कश्वी होसाळकर (३०) यांनी प्रतिकार केला खरा, पण तो विजय देण्यासाठी पुरेसा नव्हता. अमिषा म्हात्रेने ध्रुवीला आपल्या ऑफ-ब्रेकवर बोल्ड केले आणि स्पोर्टिंगला पराभवाच्या छायेत ढकलले. स्पोर्टिंगच्या दोन खेळाडू धावबाद तर एक यष्टिचीत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
भामा सी. सी.ची अंजू सिंग (स्पर्धेत सर्वोत्तम), डॅशिंगची खुशी निजाई (सर्वोत्तम फलंदाज) आणि साईनाथची श्रावणी पाटील (उत्तम गोलंदाज) तसेच स्पोर्टिंगची प्रांजल मळेकर (उदयोन्मुख खेळाडू) यांना “अविसा”तर्फे “किट” प्रदान करण्यात आले. एमसीएचे सचिव अभय हडप, मैदानातील कार्यकर्ते नदीम मेमन, अॅपेक्स कौंसिलचे केदार गोडबोले यांची उपस्थिती पारितोषिक वितरण समारंभाला लाभली. तसेच कमल सावंत, रेखा गर्दे या महिला खेळाडू खास पुण्याहून मुंबईत आल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक-
साईनाथ स्पोर्ट्स- २० षटकांत ३ बाद १५१ धावा (श्रावणी पाटील नाबाद ४७, सेजल विश्वकर्मा ६४) विजयी विरुद्ध स्पोर्टिंग युनियन- २० षटकांत ७ बाद ११६ (ध्रुवी पटेल २६, प्रांजल मळेकर १४, कश्वी होसाळकर ३०, अमिशा म्हात्रे १२ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम: श्रावणी पाटील