मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई विभागाच्या मल्लखांबपटूंनी चमकदार कामगिरी करताना घवघवीत यश संपादन केले.
सांघिक स्पर्धेत मुलींच्या तीनही गटात मुंबई विभागाने प्रथम क्रमांक मिळवला तर मुलांच्या तीनपैकी एका गटात पहिला आणि दोन गटात दुसरा क्रमांक मिळवला. वैयक्तिक स्पर्धेत त्यांच्या खेळाडूंनी एकूण १४ पदके जिंकली. मुलींच्या १४ आणि १९ वर्षांखालील गटात पहिले तीनही क्रमांक मुंबई विभागालाच मिळाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना, पद्मश्री पुरस्कारप्राप्त उदय देशपांडे, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गणेश देवरुखकर, आशिया मल्लखांब महासंघाचे सचिव अभिजित भोसले, क्रीडा उपसंचालक मुंबई विभाग नवनाथ फरताडे, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, बीमानगर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष पराग महाजन, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ८ विभागातील १९२ खेळाडू, ३० पंच, ३० स्वयंसेवक यांचा स्पर्धेत सहभाग होता. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव आणि स्पर्धाप्रमुख आशिष देवल व महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष मोहन झुंजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब, शिवछत्रपती पुरस्कारविजेते ह्रशिकेश अरणकल्ले, गणेश शिंदे, दीपक शिंदे, मल्लखांब लव अध्यक्षा संचिता देवल व मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांच्या हस्ते पार पडला. सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना पदक व शासन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मल्लखांब लव आणि बोरीवली तालुक्यातील मल्लखांब कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.
स्पर्धेतील विजेते संघ, खेळाडू-
सांघिक विजेतेपद (मुले) १४ वर्षांखालील- पुणे, १७ वर्षांखालील- कोल्हापूर, १९ वर्षांखालील- मुंबई
मुली- १४ वर्षांखालील- मुंबई, १७ वर्षांखालील- मुंबई, १९ वर्षांखालील- मुंबई
वैयक्तिक विजेते (मुले)- १४ वर्षांखालील- ध्रुव पोस्टुरे (मुंबई), १७ वर्षांखालील- ओम गाढवे (कोल्हापूर), १९ वर्षांखालील- निशांत लोखंडे (मुंबई)
मुली- १४ वर्षांखालील- पूर्वा आंबोडकर (मुंबई), १७ वर्षांखालील- तनश्री जाधव (मुंबई), १९ वर्षांखालील- खुशी पुजारी (मुंबई)