बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेलेल्या खोलवर स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७०पर्यंत नोंदविण्यात आला आहे. खोलवर स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलीकण कमी होऊन वायू गुणवत्ता सुधारल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात डिसेंबर २०२३पासून खोलवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सलग १८ आठवड्यांपासून पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रमुख हेतूने ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. या मोहिमेचे देशभरात कौतुक करण्यात येत आहे. मुंबईतील वायूप्रदूषण लक्षणीयरित्या कमी झाले असून, नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याठिकाणी सतत पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या महानगराची प्रतिमा जागतिक पातळीवरही स्वच्छ राहावी यासाठी पालिका सतत प्रयत्नशील असते. मुंबईत स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातूनच मुंबई नगरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून खोलवर स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातून एका निवडणूक प्रभागात विभागातील सर्व यंत्रणा एकवटून गत चार महिन्यांपासून स्वच्छता मोहीम राबवित आहेत. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे काही विभागात महिन्यातून एकदा, तर काही विभागात दोन महिन्यातून एकदा खोलवर स्वच्छता राबवली जात आहे. परिणामी, सार्वजनिक स्वच्छतेचा स्तर आणखी उंचावला आहे.
ही खोलवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पालिकेतर्फे ६१ मुद्दे असलेली प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. नुकतीच ३० मार्च २०२४ रोजी पालिकेच्या सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविली गेली. या मोहिमेत १४७७ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पालिकेच्या वेगवेगळ्या संयंत्रांचाही वापर करण्यात आला. सुमारे ५५६ किलोमीटर इतक्या लांबीचे रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले. या दरम्यान ७० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन झाले तर, १.५९ टन इतकी माती उचलण्यात आली. तसेच १०६.४ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. यापुढेही ही मोहीम सतत सुरू राहणार आहे.

