गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते. जीवनभर परिस्थितीशी अनेक संघर्ष करीत राहिलेल्या गवाणकर यांचा अखेरचा संघर्ष अखेर संपला. मात्र जाताना गंगाराम गवाणकर यांनी “वस्त्रहरण” या त्यांच्या अव्दितीय नाटक निर्मितीने आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या बेफाट अभिनयाने मालवणी भाषेला जगभर नेण्याचे काम केले, त्याबद्दल “कोकणी” विशेषतः “मालवणी मुलखातील” आम्ही मंडळी त्यांचे कायमचे ऋणी आहोत.
मुंबई सकाळचे माजी संपादक व प्रसिद्ध नाटककार आत्माराम सावंत यांच्यामुळे माझा गंगाराम गवाणकर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर ते माझे अत्यंत जवळचे मित्र झाले. सावंत तसेच माझे गुरूवर्य व मुंबई सकाळचे माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर, थोर साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि गंगाराम गवाणकर असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही अधूनमधून भेटत असू. गवाणकर अनेकदा मला भेटण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात येत. त्यांच्याशी अनेक विषयावर गप्पा होत. माणूस मोठा मिश्किल होता. मला भेटले की म्हणायचे, “कदम, तुम्ही जसे माझे फॅन आहात, तसा मीदेखील तुमचा फॅन आहे.” कारण त्यावेळी मी “महाराष्ट्र टाइम्स” या दैनिकात “मराठी मुलखात कोकण” हे सदर लिहीत असे. त्या सदरात मी कोकणातील अनेक विषयांना स्पर्श केला. माझे ते लिखाण गंगाराम गवाणकर नियमित वाचत असत. त्यामुळे त्यांचं माझ्याविषयीचं प्रेम अधिक घट्ट झालं होतं.

एकदा गवाणकर पत्रकार संघात आले असताना त्यांना मी एक किस्सा सांगितला. विशेष म्हणजे, त्या किश्शावरूनच त्यांची “मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण” ही एकपात्री नाट्यकृती तयार झाली, जी स्वतः ते सादर करीत. तो किस्सा असा- माझा अत्यंत जवळचा मित्र दिवंगत विकास ठाकरे राजापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचा चेअरमन होता. तो अत्यंत नाट्यवेडा होता. गवाणकर राजापूरचे आणि तोही राजापूरचा! त्यामुळे त्यांचे एक निराळं नातं होतं. विकासने पुढाकार घेऊन “वस्त्रहरण” हे नाटक लंडनला नेण्याचा घाट घातला. त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा बराचसा भार विकासनेच उचलला. या त्याच्या लंडन प्रवासाच्या बातमीचा मजकूर तयार करण्यासाठी विकास एक दिवस माझ्या घरी आला आणि त्याने त्याची संकल्पना मला सांगितली. आमची ती चर्चा माझी चित्रकार पत्नी चंद्रकला ऐकत होती. परत निघताना विकासने तिला सहज विचारलं, “वहिनी लंडनला जातोय, काही आणायचं आहे का?” माझी पत्नी म्हणाली, “गंमत करताय की सिरिअसली विचारताय? मला इथे चांगले ब्रश मिळत नाहीत, त्यामुळे चित्र अनेकदा बिघडते. चांगले ब्रश परदेशी मिळतात. त्यामुळे परदेशी निघालेल्या प्रत्येक ओळखीच्या माणसाला मी ब्रश आणायला सांगते. तुम्ही तसे ब्रश आणलेत तर मला आनंद होईल.” त्यावेळी भारतात परदेशी बनावटीचे ब्रश बाजारात मिळणे खूप कठीण होते. विकासने तिला शब्द दिला आणि ब्रशचे दोन नमुने सोबत घेऊन तो निघून गेला. लंडनहून तो परत आल्यावर त्याने त्याच्या माणसाकरवी ब्रशचे पुडके माझ्या पत्नीकडे पाठवून दिले.
किस्सा इथेच संपत नाही. “वस्त्रहरण” नाटकातील मंडळी मुंबईत परतून काही दिवस झाले होते. त्याचदरम्यान मी माझे मंत्रालयातील काम आटपून परत निघालो होतो. वाटेत आकाशवाणीजवळच्या आमदार निवासाच्या दारात एक घोळका जमलेला मला दिसला. आमदार निवासाच्या दारात असे घोळके नेहमीच पाहायला मिळत. म्हणून मी त्या घोळक्याला वळसा घालून पुढे निघालो. तेवढ्यात मागून “ओ कदमांनू ss, ओ कदमांनू ss” अशी मालवणी हाक ऐकू आली. पण मी घाईत असल्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. पण समोरून येणाऱ्या माणसाने मला थांबवलं आणि तुम्हाला मागे कोणीतरी बोलावत आहे असं सांगितलं. मागे वळून बघितलं तर त्या घोळक्याच्या मध्यभागी मच्छिंद्र कांबळी उभे होते आणि मला जवळ या, असे हातवारे करीत होते. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले की, अहो कदमांनू, तुमच्या ब्रशने आम्हाला लंडनची सर्व दुकाने फिरवली आणि आमच्या ठरलेल्या लंडनदर्शन कार्यक्रमावर व्हाईट वॉश मारला. नंतर कांबळी खूप वेळ हसत होते. मग त्यांनी त्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, लंडनला पोहोचल्यावर विकास ठाकरे म्हणाले की, मला लंडनमध्ये एक महत्त्वाचं काम आहे. ते मी पहिलं करणार आणि मग आपण इतरत्र फिरायला जाऊ. त्यानंतर विकासभाऊंनी आमची बस एका दुकानाजवळ नेली आणि स्वतःकडचं पाकीट घेऊन ते दुकानात घुसले. पण त्यांचं काम काही झालं नाही. मग त्यांनी दुसऱ्या दुकानाकडे मोर्चा वळवला. तेथेही ते हात हलवत परत आले. अशाप्रकारे विकासभाऊंनी अर्ध्याहून अधिक दिवस आम्हा सर्व मंडळींना लंडनभर फिरवलं. शेवटी कोणीतरी त्यांना एक ठिकाण सांगितलं. त्या मोठ्या दुकानात विकासभाऊ गेले आणि विजयी मुद्रेने हातात एक पुडकं घेऊन तेथून बाहेर पडले. मग आम्हीही उसासे सोडले. त्या सगळ्या प्रकारात आमचे चार-पाच तास गेले आणि तुमच्या मेहरबानीमुळे आम्हा मंडळींना लंडनचं निराळंच दर्शन घडलं. मच्छिंद्र कांबळी यांनी हा सारा किस्सा अस्खलित मालवणीत आणि त्यांच्या खास विनोदी ढंगात सर्वांना ऐकवला. आमदार निवासाच्या दाराबाहेर जमलेल्या सगळ्यांची त्यामुळे छान करमणूक झाली.

त्यानंतर एकदा गंगाराम गवाणकर मला भेटायला पत्रकार संघात आले होते. तेव्हा मी त्यांना मच्छिंद्र कांबळी यांनी सांगितलेला किस्सा ऐकवला. तेही हसायला लागले. ते म्हणाले, मी पण त्याचा साक्षीदार आहे. माझ्याकडेही इतर काही किस्से आहेत. त्यानंतर गवाणकरांनी त्यांच्या लंडन दौऱ्यातील अनेक किस्से ऐकवले. त्यात काही कलाकारांची पासपोर्ट काढण्यासाठी उडालेली तारांबळ, लंडनला साजेशा कपड्यांची तयारी, विमानात कसे वागायचे यावरून झालेला गोंधळ, तंबाखूच्या सोबत नेलेल्या पुड्या एअरपोर्टच्या बाहेर कशा न्यायच्या याची लागून राहिलेली चिंता, असे अनेक किस्से त्यांनी मला ऐकवले. तेव्हा त्यांना मी म्हणालो, हे सर्व किस्से तुम्ही लिहून का काढत नाही? ते लिहून काढा. मी तुमचा लेख दिवाळी अंकात छापतो. त्यानंतर एक नवीन पुस्तकदेखील तयार होईल. त्यावर गवाणकर इतकंच म्हणाले की, “बघतो!” आणि ते घरी निघून गेले.
त्याच रात्री त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “कदम एक संहिता मी तयार केली आहे. वाचून दाखवायची आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यायला लागेल!” मी म्हणालो, “उद्या तुम्हीच मला भेटायला पत्रकार संघात या. मग काय करायचं ते ठरवू!” दुसऱ्या दिवशी ते पत्रकार संघामध्ये आले. त्यावेळी आम्ही आगामी कोजागिरीच्या कार्यक्रमाची तयारी करीत होतो आणि तेवढ्यात गवाणकरांचे आगमन झाले. नंतर गवाणकरांशी बोलत असताना मी मध्येच त्यांना अडवून म्हणालो, “गवाणकर तुमची ही नवी कथा आमच्या कोजागिरीच्या कार्यक्रमात सादर करा. त्यासोबतच तुमच्या कार्यक्रमाची रंगीत तालीमही होऊन जाईल.” अशाप्रकारे त्यावर्षीच्या कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी गंगाराम गवाणकर यांचे नाव नक्की केले गेले. तेथेच त्यांच्या एका साहित्यकृतीचा जन्म झाला. त्या कार्यक्रमाचे नामकरण झाले, “मुंबई ते लंडन वाया वस्त्रहरण!”
(लेखक महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त)चे मुख्य संपादक तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.)
संपर्क- 9869612526

