मुंबईतल्या होमगार्ड उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपायुक्त, सशस्त्र पोलीस, ताडदेव, मुंबई यांनी केले आहे.
होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार होमगार्ड बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे.
याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तसेच मैदानी चाचणी घेणे शक्य होत नाही. ही प्रक्रिया पुढे कधी होणार याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही त्यांनी खलविले आहे.