भारतातल्या सुरक्षित आणि संरक्षित पर्यटनासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 1800111363 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 1363 या क्रमांकावर, 10 परदेशी भाषांसह हिंदी आणि इंग्रजी, अशा 12 भाषांमध्ये 24×7 बहुभाषिक पर्यटक हेल्पलाईन सुरु केली आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, चिनी, जपानी, कोरियन, अरबी, अशा परदेशी भाषांचा यात समावेश आहे. देशातल्या तसेच परदेशी पर्यटकांना देशातल्या प्रवासाशी संबंधित माहितीच्या संदर्भात मदत आणि सेवा पुरवणे आणि भारतात प्रवास करत असताना अडचणीत आलेल्या पर्यटकांना योग्य ते मार्गदर्शन करता यावे हा यामागचा हेतू आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पर्यटकांची सुरक्षितता हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे. परंतु केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य सरकारांना तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवस्थापनाला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कार्यरत असणारे पर्यटन पोलीस नेमण्याच्या सूचना करत असते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रयत्नांमधून तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, ओदिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये असे पर्यटन पोलीस तैनात आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण विभाग आणि देखरेख प्रणाली’ (CPGRAMS) या केंद्रीय पोर्टलवर सेवेतल्या दिरंगाईबद्दल तक्रारी किंवा सूचना येत असतात. या पोर्टलवर पर्यटक त्यांच्या पर्यटनाबाबतच्या तक्रारी केव्हाही नोंदवू शकतात. परदेशी पर्यटकांना भारतात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोर्टलवर तक्रारी किंवा हरकती नोंदवता येतात. पर्यटकांना सुरक्षित आणि संरक्षित प्रवास करता याव्यात यासाठी अशा सूचना या मंत्रालयाच्या प्रयत्नांनी प्रसारित होत असतात. सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्भया निधीअंतर्गत ‘महिलांसाठी सुरक्षित पर्यटनस्थल’ याचे लाभ घ्यावेत, अशा सूचना पर्यटन मंत्रालय देत असते. महिला पर्यटकांसाठीची सुरक्षा अधिक सुधारण्यासाठी याचा वापर करता येऊ शकेल, अशा सूचना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून वेळोवेळी दिल्या जातात, असेही शेखावत यांनी स्पष्ट केले.

