बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते महमद युनूस यांची हंगामी पंतप्रधान म्हणून सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा घेतला गेला. युनूस यांनी ग्रामीण बँकद्वारे वंचित घटकांसाठी सूक्ष्म वित्तपुरवठा प्रणाली विकसित केली. त्यामुळे त्यांना २००६मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.
संसद विसर्जित करून नव्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राष्ट्रपती शहाबुद्दीन आणि विद्यार्थी संघटनांच्या समन्वयकांमध्ये बैठक झाली. त्यात युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचे नेतृत्त्व सोपवण्याचे ठरले. बांगलादेशातील सध्याच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी संघटनांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ संघटनेच्या नेत्यांनी युनूस यांचे नाव हंगामी प्रमुख म्हणून सुचवले होते. त्याला त्यांनी सहमती दर्शवली होती.

या निर्णयामुळे देशातील तणाव कमी होण्याची शक्यता असली तरी अनेक आव्हाने कायम आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली आहे. झिया, यांचे वय ७९ वर्षे आहे. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. याशिवाय, १ जुलैनंतर अटक करण्यात आलेल्यांचीही मुक्तता सुरू आहे. त्यामुळे तेथील राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, जोशोर जिल्ह्यात हिंसाचाराची एक गंभीर घटना घडली आहे. एका तारांकित हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह २४ लोकांना संतप्त जमावाने जिवंत जाळले. हे हॉटेल अवामी लीगचे सरचिटणीस शाहीन चक्कलदार यांच्या मालकीचे होते. हिंसाचारामुळे मृतांची एकूण संख्या ४००वर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील शांतता प्रस्थापित करणे हंगामी सरकारसाठी एक मोठे आव्हान असेल, अशी चर्चा आहे.