ज्या गीताने साक्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नयनांमधून अश्रू आले त्या अजरामर अशा “ऐ मेरे वतन के लोगो..” या गाण्याच्या ऐतिहासिक वादातून ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दोषमुक्त केले आहे. लतादीदींना त्या वादात सुमन कल्याणपूर यांनी अजिबात दोषी धरलेले नाही. वास्तविक या गीतासाठी सुमन कल्याणपूर यांनी संपूर्ण तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी सुमन कल्याणपूर यांच्याऐवजी लतादीदींना पाचारण करण्यात आले. त्यामुळे संगीतकार रामचंद्र चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र हेच या वादात खरे दोषी होते, असे ख्यातनाम सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांनी सांगितले.
खाडिलकर यांच्या ‘माझा चरित्रात्मक लेखन प्रवास’ या व्याख्यानाने मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची फेसबुक लाईव्हद्वारे तिसऱ्या पुष्पाने सांगता झाली. खाडिलकर यांचे व्याख्यान इतके रंगत गेले की सुमारे सव्वादोन तास कुठे गेले हे कळलेच नाही. भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ‘एक मनोहर कथा’, प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या ‘सुमन सुगंध’ आणि प्रख्यात गायक प्रभाकर कारेकर यांच्या ‘स्वर प्रभाकर’ या तीन चरित्रांचे लेखन मंगलाताई खाडिलकर यांनी केले असल्याने ही तीनही चरित्रे त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून दाखविली.
या तीनही विभूतींनी आपापल्या जीवनात जे उत्तुंग कार्य केले आहे, ते या चरित्रांच्या माध्यमातून उलगडून दाखविताना मंगलाताई यांनी चक्क त्यांच्या त्यांच्या जीवनात, त्या-त्या प्रसंगात प्रत्येक रसिक श्रोत्यांना नेऊन ठेवले. प्रभाकर कारेकर यांना त्यांचे गुरु सुरेश हळदणकर यांच्याकडे आलेले अनुभव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर आणि पु. ल. देशपांडे यांचे पंडित प्रभाकर कारेकर यांच्या जीवनातील स्थान, पंडित कारेकर यांनी केलेला संघर्ष आणि त्यांनी निर्माण केलेली प्रगतीच्या अत्युच्च शिखरावरील आपली अलौकिक प्रतिमा या सर्वांचे अचूक वर्णन ‘स्वर प्रभाकर’ या त्यांच्या जीवन चरित्रात मंगलाताई खाडिलकर यांनी केले आहे.
‘सुमन सुगंध’ या गानकोकिळा सुमन कल्याणपूर यांच्या जीवन चरित्राचा प्रवास अत्यंत खडतर असल्याचे सांगताना मंगलाताईंनी अतिशय चिकाटीने त्यांच्या मुलाखती कशा घेतल्या आणि आधी दिलेल्या नकाराचे होकारात कसे परिवर्तन झाले, ही संपूर्ण वाटचाल खुलवून, फुलवून सांगितली, तेव्हा सारे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. याच सुमनताईंबद्दलच्या जीवन प्रवासातील ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ या ऐतिहासिक गीताची निर्मिती, सुमन कल्याणपूर यांच्याकडून करवून घेण्यात आलेली संपूर्ण तयारी आणि ऐनवेळी त्यांना संगीतकारांनी दिलेला नकार, त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल, उद्विग्नता, नाराजी, त्याही परिस्थितीत लतादीदींचा कोणताही नसलेला दोष अधोरेखित केला. यामुळेच भारताच्या स्वातंत्र्यापासून या गीतासंबंधी आणि भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दलचा गैरसमज आणि सुमनताई व लतादीदी या दोन महान गायिकांमधील नसलेला परंतु दाखविण्यात येत असलेला संघर्ष यासंदर्भातील मळभ सुमनताईंनी स्वतःच दूर केल्याचा, त्यांच्या मनाचा मोठेपणा अत्यंत खुमासदार रीतीने मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडून दाखविला.
मनोहर पर्रिकर यांच्या ‘एक मनोहर कथा’ या जीवनचरित्राबद्दल भरभरुन बोलताना मंगलाताई खाडिलकर यांनी मनोहर पर्रिकर यांच्या पवई आय आय टीमधील अभियांत्रिकी पदवी शिक्षण, गोव्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, भारताचे संरक्षण मंत्री, पुनश्च मुख्यमंत्री, कर्करोगाशी अयशस्वी झुंज, स्वतःच्या तब्येतीकडे केलेले दुर्लक्ष, पत्नीच्या निधनानंतर मुलांना आई आणि वडील या दोघांचे दिलेले प्रेम, माया, त्यांना आपल्या पायावर उभे करताना आपल्या नावाचा वापर न करण्याची दिलेली ताकीद, आपल्या जीवनातील जपलेली मूल्य, सिद्धांत, प्रामाणिकपणा आणि देशातील समस्त राजकारण्यांसमोर उभा केलेला आदर्शाचा वस्तुपाठ, त्यांच्या आकाली निधनामुळे पर्रिकर यांच्या जीवनचरित्राबद्दलची संभाव्य अनिश्चितता, परंतु त्याच जिद्द आणि तडफेने पर्रिकर यांच्या तमाम स्वकीयांचा संपर्क साधून हे जीवनचरित्र पूर्णत्वास नेण्यात मिळालेले यश, पर्यायाने मिळालेले आत्मिक समाधान याचे वर्णन करताना भारावलेल्या मंगलाताई अक्षरशः रसिक श्रोत्यांना गोव्यात घेऊन गेल्या.
दत्ता डावजेकर यांचे पूर्ण होऊ न शकलेले जीवनचरित्र याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रत्येक व्यक्तिमत्वाबद्दल स्वतंत्र लेख होऊ शकतो. विजय वैद्य यांनी गेल्या एकोणचाळीस वर्षांची वाटचाल यावेळी कथन केली. प्रा. नयना रेगे यांनी मंगलाताई खाडिलकर यांचा परिचय करुन दिला. खुसखुशीत सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. निशा शिंदे टेमकर आणि प्रणाली रिकामे यांनी शारदास्तवन तसेच राष्ट्रगीताचे गायन सुरेल स्वरात केले.