मुंबईत म्हाडातर्फे विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या ३७० सदनिकांच्या (घरांच्या) किंमतीत १० ते २५ टक्के घट करतानाच याकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरपर्यंत मुदवाढ देण्यात आल्याची घोषमा काल राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली.
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) तसेच ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या या ३७० सदनिका आहेत. या सदनिकांच्या विक्रीच्या किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत घट करण्यात येत असल्याचे सावे यांनी सांगितले.
म्हाडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला येत्या १९ सप्टेंबर २०२४पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त असून अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.
प्राप्त अर्जांच्या संगणकीय सोडतीचा दिनांक व ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.