कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देण्यात येते. फणस वरुन काटेरी असतो, पण आतून गरे गोड असतात. अशाच स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मिनाक्षीताई पाटील यांना ही फणसाची उपमा अगदी तंतोतंत लागू होते. माझे वडील, ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक वसंतराव त्रिवेदी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत सक्रीय होते, तेव्हापासूनच मिनाक्षीताई यांच्या संपर्कात आलो. त्याही झुंझार पत्रकार या नात्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत कार्यरत होत्या. मिनाक्षीताई पाटील यांना सामाजिक कार्याचे आणि पत्रकारितेचे बाळकडू घरातूनच मिळाले होते.
प्रभाकर पाटील हे तडाखेबंद व्यक्तिमत्व म्हणजे मिनाक्षीताई यांचे वडील. भाई जयंत पाटील हे मिनाक्षीताई यांचे बंधुराज. तेही जबरदस्त धारदार व्यक्तिमत्व. कृषिवल साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर झाले. शेतकरी कामगार पक्षाचे जणू कृषिवल हे मुखपत्रच बनले. प्रभाकर पाटील यांनी सुरू केलेले कृषिवल पुढे जयंतराव आणि मिनाक्षीताई आणि मग ते पुढच्या पिढीकडे वारसाहक्काने चालत आले. पाटलांची तिसरी पिढी कृषिवल अगदी जोमाने चालवीत आहे. या कृषिवलमधूनच कविबंधू जगदीश यांची ओळख होऊन मैत्रीत रुपांतर झाले. साप्ताहिक असताना कृषिवल नियमितपणे अंबरनाथ येथे आमच्या घरी टपालाने येत असे.
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रायगड जिल्ह्यातील पाटील परिवाराने शेतकरी कामगार पक्षाचे खटारा हे चिन्ह सांभाळून पुढे नेले. यशवंतराव चव्हाण यांनी १९५७ साली यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये आणले असले तरी भाई उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळप, विठ्ठलराव हांडे, दि. बा. पाटील, दत्ता पाटील यांच्यापासून तर मोहन पाटील, विवेक पाटील, धैर्यशील पाटील आदींनी शेतकरी कामगार पक्ष जोमाने वाढविला. पण काळाच्या ओघात हा पक्ष कमकुवत झाला. तरीही रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्त्व टिकविण्याचे काम मिनाक्षीताई आणि भाई जयंत पाटील प्रामाणिकपणे करीत आहेत.
१९७७ साली भारतीय जनसंघ, समाजवादी, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल या चार पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सत्तेवर आला. १९७८ साली शरद पवारांनी जनता पक्षाबरोबर पुरोगामी लोकशाही दल बनवून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या सरकारात शेतकरी कामगार पक्ष सहभागी झाला. नंतरच्या सरकारमध्ये शेतकरी कामगार पक्ष सहभागी होताना त्यात मिनाक्षीताई पाटील यांना राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे १९९५पासून २०१४पर्यंत तीन वेळा मिनाक्षीताई पाटील यांनी यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच वर्षी मिनाक्षीताई पाटील यांचा जन्म झाला. भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ‘अमृततुल्य’ अशा मिनाक्षीताई पाटील यांचाही अमृतमहोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करताना मिनाक्षीताईंनी त्या-त्या पदाचा समाजासाठी उपयोग केला. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना त्या धारेवर धरल्याशिवाय राहत नव्हत्या. तसेच सत्तेत असताना त्यांनी कधी ती डोक्यात जाऊ दिली नाही. कोणत्याही पदाचा कधीही गाजावाजा केला नाही की बडेजावपणा दाखविला नाही. जाहीर सभा असो की विधानसभा. या ठिकाणी त्या रणरागिणीच्या रुपात अक्षरशः विरोधकांवर तुटून पडत. आपल्या घणाघाती भाषणाने त्या समोरच्याला ‘दे माय धरणी ठाय’ करायला लावीत.
करारी स्वभावाच्या मिनाक्षीताई अत्यंत कनवाळू स्वभावाच्याही आहेत. अन्यायाविरुद्ध आग ओकणाऱ्या मिनाक्षीताई पाटील अन्यायग्रस्तांसाठी कनवाळू होतानाही दिसून येतात. एखादी गोष्ट चांगली वाटली की त्याची स्तुती त्या मुक्तकंठाने करतात. एकदा राज्यमंत्री असताना मिनाक्षीताई कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत बोरीवली येथे आल्या होत्या. मी अंबरनाथ येथून बोरीवली येथे स्थायिक झालो होतो. मिनाक्षीताई पाटील यांचे स्वीय सहायक अविनाश पाटील सोबत होते. लाल दिव्याची गाडी मला दिसली. म्हटलं कोण आहे? पाहतो तो मिनाक्षीताई पाटील. अविनाश पाटील यांच्याबरोबर संपर्क साधला. मिनाक्षीताईंना म्हणालो, ताई, भावाचं घर जवळच आहे. मिनाक्षीताई यांनी लगेच गाडी फिरवली आणि त्या माझ्या घरी आल्या. मनसोक्त गप्पा मारल्या. आमचे मिनाक्षीताईंबरोबर कौटुंबिक संबंध असल्याने त्या हक्काने घरी आल्या होत्या. माझी पत्नी माया हिने त्यांच्यासाठी कोथिंबीरवडी बनविली होती. त्यांनी ती चवीने खाल्ली. मग विधानभवनात भेटल्या की अरे, वहिनीला सांग ती कोथिंबीरवडी चांगली होती, पुन्हा बनवून पाठव, असे आवर्जून सांगत. प्रेमादराने पाठीवर धपाटा घालायलाही त्या कमी करीत नाहीत. या झुंझार रणरागिणीला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो…