गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) फिल्म बाजारात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या छबीला, तेरव, विषयहार्ड, आत्मपॅमप्लेट या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजीमधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. त्याचबरोबर इफ्फीच्या विविध स्पर्धात्मक विभागात निवडल्या गेलेल्या रावसाहेब, लिंपन, घरत गणपती या चित्रपटांच्या टीमचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मा शिरोमणी, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, ऑस्कर ज्युरी उज्ज्वल निर्गुडकर, महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, इम्पाचे अभय सिंह, सिने समीक्षक डॉ. संतोष पाठारे, गणेश मतकरी, मनोज कदम , चित्रपटांचे प्रतिनिधी त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच अशाप्रकारचा सन्मान चित्रपटाच्या टीमचा करण्यात आला. त्यामुळे सन्मान करण्यात आलेल्या चित्रपटांच्या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.
चित्रपटांच्या स्क्रीनिंगला सिने प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद
महामंडळाचा वतीने पाठवण्यात आलेल्या छबिला, आत्म पॅम्प्लेट, विषय हार्ड, तेरव या चित्रपटांचे स्क्रिनिंग फिल्म बाझारमध्ये पार पडले या संपूर्ण स्क्रिनिंग उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून देश विदेशातील सिने अभ्यासकांनी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांचे कौतुक केले.

दर्जेदार मराठी चित्रपटांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे
मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. इफ्फीच्या फिल्म बाजारात सहभागी होणे हे त्याचेच उदाहरण असून आगामी काळातदेखील असेच उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
