Homeब्लॅक अँड व्हाईट'मंदिर' हा काही...

‘मंदिर’ हा काही सिंगल स्क्रीन थिएटरचा अनमोल ठेवा!

सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी थिएटरच्या अंधारात हमखास टाळी व शिट्टी पडणारच. नेहमीच्या तिकीटात जास्त मोठा चित्रपट पाहयला मिळणार अशी त्या शिट्टीमागे भावना असे.‌ दिग्दर्शक बासू चटर्जींचा चित्रपट चौदा रिळांचा असतो तर दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जींचा चित्रपट सोळा रिळांचा असतो, अशी समीकरणे सत्तर व ऐंशीच्या दशकातील चित्रपट संस्कृतीत जणू फिट्ट होती आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा चित्रपट अठरा रिळांचा हे जास्त आवडायचे. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगातील मुंबईतली अनेक थिएटर आज बंद पडल्याचे नक्कीच दुःख आहे. अशातच दक्षिणमध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृह आजही कार्यरत आहे याचा विलक्षण आनंद आहे. गिरगावात लहानाचा मोठा होताना कुलाब्याच्या डिफेन्स चित्रपटगृह ते सात रस्ता येथील न्यू शिरीन चित्रपटगृहापर्यत सर्वच सिंगल स्क्रीन थिएटर अनुभवली. आज मराठा मंदिर थिएटर्सच्या आसपास गेलो तरी माझे बालपण मला पटकन आठवते. आज तेथे मेट्रो आली आहे हे विशेष.

मला आठवतंय, अगदी साठच्या दशकात मुंबई सेंट्रल (बाॅम्बे सेंट्रल हे पूर्वीच्या पिढीच्या तोंडी चालताबोलताऐकता बसलेले) एस. टी. स्थानकातून मामाच्या गावाला अलिबाग तालुक्यातील‌ चौल‌ येथे जाण्यासाठी सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा वाजता अशी दोनदाच मुंबई ते रेवदंडा अशी एस. टी. गाडी असे आणि ती सुटताच लगेचच दिसत असलेल्या मराठा मंदिर थिएटरवर हमखास नजर पडे. अतिशय आखीव, रेखीव, देखणी अशी वास्तू लक्षवेधक ठरे. हे अतिशय आलिशान, वैभवशाली वातानुकूलित असे चित्रपटगृह आहे हे त्याकडे बघताच लक्षात येई. विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०) हा बहुचर्चित चित्रपट सहकुटूंब पाहण्यासाठी या मराठा मंदिरला सर्वप्रथम गेलो. अर्थात, तेव्हाचे माझे वय पाहता चित्रपट आणि चित्रपटगृह यांची ओळख होणे शक्यच नव्हते. (चित्रपटाची ओळख होणे, वाढत जाणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हा रिॲलिटी शो ‘दिसत’ नाही. पण ते वास्तव आहे. वयानुसार चित्रपट कळतो, समजतो आणि आवडतो अथवा नाही.) महिन्यातून एकदा पिक्चरला जाणे ही तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात घडणारी हुकमी गोष्ट. त्या काळात घरात एकटा कुटूंबप्रमुख नोकरी करत असे. त्या एका पगारात संपूर्ण कुटूंब महिन्यात एकच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाऊ शकत होते.

गिरगाव चौपाटीवरील भवन्स कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रांसोबत पिक्चर एन्जाॅय करण्याची सवय आपोआप लागतेच. हळूहळू मराठा मंदिर थिएटरला एकेक चित्रपट पाहू लागलो, त्याचे अंतर्बाह्य वैभव जाणवू लागले. ही एक प्रतिष्ठित वास्तू आहे हे लक्षात येताच माझ्याही वागण्यात बदल होत गेला. चित्रपट अशा पद्धतीनेही माणूस घडवतो. ज्या सहजतेने सेन्ट्रल थिएटरमध्ये आम्ही मित्र मस्करी करत असू तसे मराठा मंदिरला वावरणे योग्य नाही हे लक्षात आले. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटर्सची आपली स्वतंत्र ओळख आणि व्यक्तिमत्त्व असते असे मी कायमच म्हणतोय आणि आज मी ते लिहितोय. ते हे असे. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘साधना’ ( १९५८) या चित्रपटाने मराठा मंदिर थिएटरचे १६ ऑक्टोबर १९५८ रोजी उदघाटन झाले. या चित्रपटात सुनील दत्त, वैजयंतीमाला, लीला चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचा प्रीमियर गाजला. त्या काळातील चित्रपट विश्लेषकांनी त्याच्या आठवणी सतत पुढील पिढीला सांगितल्याने त्या माझ्या पिढीला समजल्या. म्हणजेच मराठा मंदिर चित्रपटगृहाला ६७ वर्षे पूर्ण झालीदेखील.

हळूहळू मराठा मंदिर थिएटर माझ्या सवयीचे झाले. मुंबई सेंट्रल, ताडदेव, आग्रीपाडा, सात रस्ता, ग्रॅन्ट रोड, नागपाडा या परिसरातील रसिकांना जवळचे. आम्हा गिरगावकरांना ६१ आणि ६६ क्रमांकाच्या बेस्ट बसमधून नायर रुग्णालय स्टाॅपवर उतरुन जावे लागे. कंडक्टरला पैसे देत ‘एक मराठा मंदिर’ इतकेच बोललो तरी पुरेसे असे. मुंबईतील अनेक बसस्थानके चित्रपटगृह व चित्रपट स्टुडिओ यांच्या नावाने ओळखली जातात हे विशेष. हीदेखील एक चित्रपट संस्कृती. मराठा मंदिरची वैशिष्ट्ये अनेक. ती मी माझ्या आवडीचा भाग म्हणून जाणून घेतली.
के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (रिलीज ५ ऑगस्ट १९६०) येथे प्रदर्शित होताना आगाऊ तिकीट विक्रीच्या खिडकीबाहेर पहाटेपासूनच अबब म्हणावी अशी लांबलचक रांग. त्यात प्रचंड धक्काबुक्की झाली. एकादोघांना भोसकल्याचीही बातमी गाजली. थिएटरवरचे डेकोरेशन अतिशय भव्य आणि नेत्रदीपक.

पिक्चरच्या प्रिमियरच्या वेळची अक्षरश: प्रचंड गर्दी. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सचे, फिल्मवाल्यांचे आगमन. एक प्रकारचा जणू सणच. आजच्या भाषेत इव्हेन्ट. मोठ्या चित्रपटाचे प्रीमियर ही एक रंगतदार गोष्ट. मराठा मंदिरच्या या यशोगाथेत असे वैशिष्ट्यपूर्ण क्षण खूपच. विजय आनंद दिग्दर्शित. ‘गाईड’ (१९६७) आणि ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०), कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ (१९७२) यांचे प्रीमियर गाजले. ऐसपैस डेकोरेशन या खासियतेमुळे येथील अनेक पिक्चर्सची होर्डींंग्स डिझाईन पाहण्यातही विशेष रुची असे. मेन थिएटरची ती खासियतच. तेवढ्यासाठीच मराठा मंदिर परिसरात चक्कर मारणारे माझ्यासारखे फिल्म दीवाने भरपूर. या थिएटरचे हेदेखील एक यशच. तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, फरार, खेल खेल में, रिक्षावाला, कहानी किस्मत की, अमीर गरीब, बारुद, द बर्निंग ट्रेन, अब्दुल्ला, ड्रीम गर्ल, अग्रीमेंट, अपनापन, रझिया सुलतान, गांधी, अंदर बाहर, धरम कांटा, कर्मा, मिस्टर इंडिया, जादुगर, अग्निपथ, खुदा गवाह, वास्तव… नावे वाढत जातील. गंमत म्हणजे, अनेक पिक्चर्सचे डेकोरेशनच फक्त पाहण्यासारखे होते. तेवढे पाहण्यातही रोमांचकता असे. थिएटरला बाहेरच्या बाजूलाच शो कार्ड्स असल्याने तो एक प्रकारचा बोनसच. तोही हवाहवासा.

कमाल अमरोही दिग्दर्शित “रझिया सुलतान” या बहुचर्चित भव्यदिव्य चित्रपटाच्या डेकोरेशनमधील भव्य गरुड आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ते डेकोरेशन भन्नाट होते. पण चित्रपट एकदमच फुसका बार ठरला. हीदेखील एक महत्त्वाची आठवण. टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशाह ‘ (१९८८)चे येथील रिलीज बहुचर्चित! या पिक्चरच्या रिलीजला प्रचंड विरोध वाढला होता. कारण, बिग बीचा बोफोर्स प्रकरणात कथित सहभाग. अर्थात तो विषयच वेगळा. सिनेमाला संरक्षण म्हणून मराठा मंदिर थिएटरबाहेर पोलीस व्हॅन उभी. ‘शहेनशाह’ रिलीज झाला आणि वाद निवळत निवळत गेला. तीन आठवड्यांनी ही सुरक्षा बाजूला केली गेली. बिग बी आणि मराठा मंदिर थिएटरच्या इतिहासातील ही एक वेगळीच गोष्ट. मराठा मंदिरची मॅटीनी शोची परंपरा अशीच वेगळी. यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ (राजेश खन्ना व नंदा) या रहस्यरंजक चित्रपट नियमित खेळासाठी प्रदर्शित झाला आणि मग येथेच मॅटीनी शोला ज्युबिली हिट यश संपादले. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’ टॅक्स फ्री असल्याने एक रुपया सात पैसे असे त्याचे तिकीट होते आणि माझ्या खिशात मोजून तेवढीच नाणी असल्याने कधी एकदा हाती तिकीट येतेय असे मला झाले होते. उगाच पाच पैसे हातून पडलेच तर पिक्चर न पाहता मला घरी यावे लागले असते.

भारती राजा दिग्दर्शित श्रीदेवीचा पहिला चित्रपट ‘सोलवा सावन’ (१९८०) येथेच मॅटीनी शोला होता. अमोल पालेकर या चित्रपटाचे नायक होते. हा चित्रपट साऊथ इंडियन असल्याचे पोस्टरवरुनच जाणवल्यानेच तो नाकारला गेला. मुकुल आनंद दिग्दर्शित “अग्निपथ” (१९९०)चे हाऊसफुल्ल गर्दीत स्वागत झाले. पण अमिताभ बच्चनच्या आवाजावर मुकुल आनंदने केलेला प्रयोग चित्रपट रसिकांना आवडला नाही. अनेकांना वाटले थिएटरच्या साऊंड सिस्टीममध्ये काही गडबड आहे. पण तसे नव्हते. आठवडाभरात नव्याने डबिऺंग करून, नवीन प्रिंट काढून ती सगळीकडे प्रदर्शित केली गेली. मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या अपयशी चित्रपटात काला आदमी, लेडिज टेलर, करिश्मा, पापी पेट का सवाल है, महाराजा अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या सगळ्यात यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (डीडीएलजे, १९९५) ने येथेच मॅटीनी शोला इतिहास घडवला आणि मराठा मंदिर थिएटर जगभरात पोहोचले. पहिले पन्नास आठवडे न्यू एक्सलसियर थिएटरमध्ये दिवसा तीन खेळ याप्रमाणे यशस्वी घौडदौड केल्यावर डीडीएलजे मराठा मंदिरला मॅटीनी शोला शिफ्ट केला गेला आणि मग एकेक वर्ष करत करत तीस वर्षांनंतरही त्याचा प्रवास सुरुच राहिला. हे जगावेगळेच यश. कोरोना प्रतिबंधक काळात ते काही काळ थांबले होते इतकेच. अन्यथा एकदा पब्लिकला आवडलेला पिक्चर थिएटरमधून उतरला तरी पडद्यावर त्याचा प्रभाव असतो. डीडीएलजेच्या दीर्घकालीन मुक्कामाची महती जगभरातील चित्रपट रसिकांसमोर पोहोचताना मराठा मंदिर थिएटरही आपोआप पोहोचलेच.

चित्रपटांचे यशही कधीच एका ओळीची गोष्ट नसते. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स इतिहासजमा होत असतानाच मराठा मंदिर आपली वैभवशाली परंपरा कायम ठेवून आहे याचा आम्हा चित्रपट व्यसनींना खूपच आनंद होतोय. भविष्यात काय होणार माहित नाही. कदाचित आजच्या मल्टीप्लेक्स आणि ओटीटी पिढीला माहित नसेल, आपल्या देशातील अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या नावात ‘मंदिर’ असल्याचे दिसेल. यावरुन या वास्तूला पवित्र मानले जाते हेच अधोरेखित होतेय. हीदेखील एक चित्रपटगृृह परंपराच. अगदी आमच्या अलिबागमधील ब्रह्मा विष्णु महेश या थिएटरचे नाव महेश चित्र मंदिर असेच होते. अगदी माझ्या मामाच्या गावाला म्हणजेच चौलला गेल्यावर रेवदंड्याच्या गणेश चित्र मंदिर या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहयला जायचो. चित्रपटगृहाच्या नावातील ‘मंदिर ‘ हा खूपच मोठा ठेवा आहे. मराठा मंदिर थिएटर तेच अधोरेखित करतेय. आपल्या देशातील चित्रपट संस्कृती जगावेगळी आहे असे मी कायमच आवर्जून सांगतो याचे उत्तर अशा गोष्टींतून मिळत जाते. मराठा मंदिर चित्रपटगृह आजही कार्यरत आहे आणि यापुढेही तेथील रुपेरी पडद्यावरील चित्रपटाचा खेळ रंगत राहिल असा विश्वास आहे. मल्टीप्लेक्स, होम थिएटर, यू ट्यूब, ओटीटी यांच्या युगात एक सिंगल स्क्रीन थिएटर आपल्या वैशिष्ट्यांसह आजही यशस्वी वाटचाल करतंय हे विशेष उल्लेखनीय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

९२ वर्षांचे झाले कुलाब्याचे रिगल!

अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले" (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या...

आता काय तर म्हणे शाहरुख खान…

शाहरुख खानला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' (२००४)मधील मोहन भार्गव ही व्यक्तीरेखा उत्तम साकारली म्हणून म्हणा अथवा शिमित अमिन दिग्दर्शित 'चक दे इंडिया' (२००७)मधील हॉकी संघ प्रशिक्षक कबीर खान, या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असते...

पाडायला घेतलाय अमिताभच्या पिक्चरसाठी खास असलेला ‘अलंकार’!

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या. त्या खूपच रंजक. विशेषतः एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि लोकप्रिय चित्रपटाचा. त्यातील काहींचा कधी पंचवीस तर कधी पन्नास आठवड्यांचा (कधी त्याहीपेक्षा जास्त) मुक्काम. आणि त्यात काही जणू विक्रम ठरले. दक्षिण मुंबईतील...
Skip to content