राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सतत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे का, याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असल्याच्या नितेश राणे यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही शिरसाट यांनी केली. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत पाहिले तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराच्या घटना घडतात कशा हे कळायला हवे. नितेश राणे यांनी केलेले आरोप एवढे गंभीर आहेत की, 2004 साली मातोश्रीवर जी बैठक झाली त्या बैठकीत एक वरिष्ठ नेते आणि लोकाधिकार संघटनेचे सरचिटणीस हे दोघे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही भागात हिंसाचार घडवण्याच्या त्यांना सूचना दिल्या. मुस्लीम भागात हत्यारे नेऊन हल्ले करा. त्यामुळे हिंसाचार होईल. 1995 आणि 1997मध्ये हिंसाचाराच्या घटनांमुळे सत्ता मिळाली होती. त्यामुळे पुन्हा 2004मध्ये असे काही घडवून सत्ता मिळवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता. आता सरकार गेल्यावर पुन्हा असे प्रकार वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असेही शिरसाट यांनी सांगितले.
कारण नसताना हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मात्र याचा आरोप दुसऱ्यावर ढकलून पुन्हा हिंदू एकजूट कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू केला जात आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटत आहे की, जे कोणी हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, ज्यांच्यामुळे या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली पाहिजे. त्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमचे एक शिष्टमंडळ भेट घेणार आहे, असेही ते म्हणाले.

