दीवमध्ये झालेल्या पहिल्याच समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धांमध्ये, मध्य प्रदेशने 7 सुवर्णपदकांसह एकूण 18 पदकांची कमाई करुन बाजी मारत स्पर्धेचे एकंदर अजिंक्यपद पटकावले.
दीवच्या घोघला बीच या प्रिस्टिन ब्लू फ्लॅग प्रमाणित (स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचे प्रमाणपत्र) समुद्र किनारी, बीच गेम्स 2024 ही विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेली क्रीडास्पर्धा, यावर्षी 4 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या उल्लेखनीय कामगिरीमुळे मध्य प्रदेशच्या क्रीडा पथकातील क्रीडाकौशल्य तर दिसलंच, सोबत राज्यात खोलवर रुजलेले क्रीडानैपुण्य आणि दडलेली क्रीडा गुणवत्ता सर्वांसमोर आली.
महाराष्ट्राने 3 सुवर्णपदकांसह एकूण 14 पदके जिंकली. तामिळनाडू, उत्तराखंड ही राज्ये आणि यजमान दादरा-नगर हवेली-दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशाने प्रत्येकी एकूण 12 पदके पटकावली. आसामने 5 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली.
बीच सॉकर या समुद्रकिनारी फुटबॉल स्पर्धेच्या अत्यंत रोमहर्षक अशा लढतीत, लक्षद्वीपने सुवर्णपदक जिंकत आपल्या स्वच्छ आणि सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी प्रदेशाकरता इतिहास रचला. लक्षद्वीपने अंतिम फेरीत महाराष्ट्रावर 5-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. लक्षद्वीपने पदकविजेत्यांच्या यादीतील वैविध्यतेतच फक्त भर घातली असे नव्हे, तर दीव बीच गेम्स 2024 चा सर्वसमावेशक आणि राष्ट्रव्यापी प्रभाव अधोरेखित केला.
या क्रीडा स्पर्धेत 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 1404 क्रीडापटूंनी भाग घेतला. हे सर्व क्रीडापटू वयाने 21 वर्षाखालील होते. विविध क्रीडा प्रकारांमध्ये 205 जणांनी सामना अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रतिदिन, सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन नंतर पुढे, अशा दोन सत्रांमध्ये क्रीडा स्पर्धा होत होत्या. या अशाप्रकारच्या वेळापत्रकानुसार सामने होत असल्याने, क्रीडानुकूल हवामानामुळे खेळाडूंची कामगिरी तर चांगली खुललीच, सोबत उत्साही प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडून त्यांना अधिक सुखद वातावरणात खेळाचा आनंद लुटता आला.
जलतरण, पेनकाक सिलेट या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातली कलात्मकता, मल्लखांबातील शारीरिक कसरतींचे नेत्रदीपक प्रदर्शन, बीच व्हॉलीबॉलचा वेगवान खेळ, कबड्डीच्या व्यूहरचनात्मक चढाया आणि बीच फुटबॉलची वेगवान आक्रमणे तसेच युक्तीपूर्ण गोल यांच्या, खेळातील व्यूहरचनांपासून ते स्पर्धेतल्या शेवटच्या थरारापर्यंत, प्रत्येक खेळाने स्पर्धेत आपापली वेगळी अशी अनोखी उर्जा ओतली आणि रंगत वाढवली. बीच बॉक्सिंग या मुष्टीयुद्ध प्रकाराच्या नव्या समावेशामुळे रोमांचकतेची नवी पातळी गाठली गेली. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही मजा आली आणि देशाच्या क्रीडा प्रवासातील ऐतिहासिक क्षण साजरा झाला.
केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशाद्वारे, या क्रीडा स्पर्धेबाबत औत्सुक्य दाखवत, आपले पाठबळ दर्शवले आहे. त्यांच्या टिप्पणीचे शीर्षक असे आहे-“खेळाडूंची उर्जा आणि दीवचे सौंदर्य यांनी पूर्वी कधीही न अनुभवलेले असे मंत्रमुग्ध करणारे आणि उत्साहवर्धक वातावरण यांचा सुंदर मेळ साधला आहे. ते पुढे म्हणाले की, गुजरातच्या किनारपट्टीला लागून असलेल्या दीव इथे झालेल्या पहिल्याच समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाने, भारताच्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये नवा जीव ओतण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला खेळाचे वळण लाभले आहे.
भारताला नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यांचे वरदान लाभले असून जगातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी काही समुद्रकिनारे भारतात आहेत. भारतातील बारा समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते. तथापि देशातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना अजूनही हवे तितके माहीत झालेले नाहीत. त्यामुळे दीव बीच गेम्स या दीव मध्ये आयोजित समुद्र किनारी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन ही एक सुखावणारी बातमी आहे.