माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊदशी संबंधित असून या प्रकरणात युवा सेना प्रमुख या महिलेला पाठीशी घालत आहेत. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
आज दुपारी नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे, एड. चित्रा साळुंखे उपस्थित होत्या.
माझ्या विरोधात तक्रार करणारी महिला पाकिस्तान आणि डी गँगशी संबंधित असल्याची आपली माहिती आहे. दुबई पोलिसांचीही माहिती आहे. सदर महिला व्यावसायिक तक्रारदार असून ती आणि तिचे संपूर्ण कुटूंब वादग्रस्त आहे. त्यांच्यावर याधीही अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत. सदर महिलेने मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटुंबियांना दोन वर्षांपासून धमकावले. कोविड काळात मी केलेल्या मदतीचा गैरफायदा घेऊन माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या प्रकरणी अंधेरी न्यायालयाने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदर महिलेच्या विरोधात माझ्या पत्नीने गोवंडी पोलीसठाण्यातदेखील तक्रार दाखल केली आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत, असेही ते म्हणाले.
अशा या महिलेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिलेला सार्वजनिकरित्या व्यासपीठावर आणले गेले, हीच गंभीर बाब आहे. हे सगळे युवासेना आणि राष्ट्रवादीचे कारस्थान आहे. सदर महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्ट कोण फॉलो करत आहेत, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. युवासेना यात आधीपासून आघाडीवर होती. त्यांनी घर जोडण्याचा नाही तर माझे घर आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा दावाही शेवाळे यांनी केला.

