उद्धव ठाकरे यांनी आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आयुष्य आलिशान पद्धतीने जगण्यासाठी फक्त खंडणीचाच आधार घेतला, खंडणीचाच वापर केला आणि आता त्यांचे कार्यकर्ते याच मार्गाने आपले जीवन जगत चालले आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
काल रात्री बीडमध्ये झालेली घटना पुरेशी बोलकी आहे. आम्ही पूर्वीपासून सांगत होतो की, महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात वसुली, खंडणी गोळा केली जात होती. त्यामुळेच तेव्हाच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले होते. पोलिसांवर कारवाया कराव्या लागल्या होत्या. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर क्रिकेटच्या बुकींकडून खंडणी उकळण्याचापण आरोप झाला होता. काल शिवसेनेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचे समजले. तसे त्यांच्याच जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले आहे. आम्ही कोणत्याही महिलेच्या महाराणीच्या समर्थन करत नाही. सुषमाताई देवीदेवतांवर काही बोलल्या असल्या, आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असली तरीसुद्धा त्यांना मारहाण व्हावी, असा विचार आमच्या मनामध्ये कधी येणार नाही. परंतु तेथील जिल्हाप्रमुखांनी सुषमा अंधारेंवर आरोप केले ते फार गंभीर आहेत. सुषमाताईंनी पदे विकायला काढली आहेत. सोफा आणि एसीसाठीसुद्धा पैसे मागत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. नारायणराव राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा रंगशारदामध्ये केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक पदे विकण्याचे काम करतात, हेच सांगितले होते. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या आमदारांनी हाच आरोप केला की, उद्धव ठाकरे यांची माणसे पदे आणि तिकीटे विकत आहेत. आताही तोच आरोप होतोय. वारंवार जर असे आरोप होत असतील तर त्यात तथ्य आहे हे निश्चित, असे राणे म्हणाले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात हेच केले आहे. एक रुपयाचे इन्कम नसताना ते आलीशान आयुष्य जगत आहेत. मातोश्रीमध्ये लावण्यात आलेले एसी फक्त व्हिडिओकॉनचे दिसतील. व्हिडिओकॉनचे प्रमुख सूद खासदार कसे झाले, हे त्यांनी सांगावे. आजही यांचे सर्व कपडे लॉन्ड्रीसाठी लीला हॉटेलमध्ये जातात. का? तर तेथे भारतीय कामगार सेनेची युनियन आहे. मातोश्रीमधल्या गाड्या, त्यांचे मेंटेनन्स पटेल नावाचा माणूस करतो. यांचे लंडन, युरोपमधले सगळे दौरेसुद्धा खिशातना एकही पैसा खर्च न करता केले जातात. वेगवेगळे उद्योगपती त्यांची हॉटेल आणि सर्व प्रवासाचा खर्च करतात. यांची सर्व बिले आपण देऊ शकतो. सुषमा अंधारे आणि संजय राजाराम राऊत यापेक्षा वेगळे काय करणार? पक्षप्रमुख असा तर आम्ही त्याच पावलावर पाऊल टाकणार असे त्यांचे वागणे चालले आहे, असे ते म्हणाले.
त्रंबकेश्वरमध्ये झालेल्या प्रकारावर बोलताना संजय राऊत यांनी हिंदू बांधवांना खंडणी आणि दरोडेखोर म्हटले आहे. हिंदू बांधवांना खंडणीखोर आणि दरोडेखोर बोलण्याआधी तुम्ही स्वतः खंडणीवर जगता आणि महाराष्ट्राला लुटता, आणि दुसऱ्यावर काय आरोप करता, असा सवाल राणे यांनी केला. काल देवेंद्र फडणवीस यांनीही सचिन वाझे याला पोलीस खात्यात पुन्हा का घेतले गेले याची सविस्तर माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबाचा खर्च करण्यासाठी याच वाझेला मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी एक खोली दिली होती. या खोलीत बसून तू काम कर आणि महिन्याला एवढे आणून दे असे त्यांनी सांगितले होते. हा माणूस स्वतः खंडणीवर जगतो आणि दुसऱ्यांवर काय आरोप करता? या उद्धव ठाकरेंच्या पूर्ण कुटुंबाच्या अंगावर परफ्यूम मारला जातो तो विमानतळाच्या ड्युटी फ्री शॉपमधून पूर्ण महिन्याचा स्टॉक आणळ्यावर. तोही फुकटचा. कर भरण्यासारखा कोणता धंदा हे करतात? गेले पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेला लुटल्याशिवाय यांनी काय केले नाही. यांचा मुलगा पेंग्विन ठाकरे राज्यपालांकडे जाऊन आमच्या भ्रष्टाचारावर पत्र देतात. माझे त्यांना ओपन आव्हान आहे, त्यांनी माझ्याबरोबर राज्यपालांकडे यावे. तुम्ही तुमचे पुरावे घोऊन या आणि मी माझे पुरावे आणतो. होऊन जाऊ दे, जे काय व्हायचे ते… मिठी नदीच्या स्वच्छतेपासून कोरोनापर्यंत सगळ्यात यांनी पैसे खाल्ले आणि आता हिंदू समाजाला दरोडेखोर, खंडणीखोर बोलता, असा सवालही त्यांनी केला.
संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर झाले आहे. तुम्हाला फक्त हज यात्रेत पाठवायचे बाकी राहिले आहे. जिहादी मुसलमानांप्रमाणे ते आता बोलायला लागले आहेत. आजच्या मुखपत्रात त्यांनी हिंदुत्वावर मोठमोठे दावे केले आहे. त्र्यंबकचा विषय बोलायचा तर तुम्ही तुमचा उरूस काढा ना.. दरवर्षी काढता तसा काढा. पण, मंदिरात जाऊन सादर चढवायचा हट्ट कशासाठी? आता राऊत यांनी आपले अंगरक्षक बाजूला ठेवून त्र्यंबकेश्वर जाऊन परत येऊन दाखवावे. आज हुसेन दलवाई तेथे जाऊन आगीत तेल घालून आले आहेत. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मंदिरे बंद केली. आमच्या सणांवर निर्बंध आणली गेली. गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीपासून मंडपाच्या उंचीपर्यंत सर्वांवर निर्बंध आणले. मात्र त्याचवेळेला त्यांच्या सणाला कोणताही अटकाव झाला नाही. कोरोनाचा काळ असल्यामुळे कोरोना पसरू नये म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करून सरकारला पूर्ण सहकार्य केले. पण त्याच काळात याच उद्धव ठाकरेंचा मुलगा ओपन हाऊसमध्ये बसून दारू पिऊन मजा मारत होता. तेव्हा कोरोना पसरत नव्हता का, असा सवालही नितेश राणे यांनी केला.
गोमुत्राबद्दल यांना फारच द्वेष आहे. पण तुम्हाला सांगतो, गोमूत्र आम्ही पवित्र मानतो. गोमातेला आम्ही देव समजतो. पुजतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे धर्मांतर झाले असल्याने त्यांना आस्था राहिलेली नाही. गायींबद्दल आस्था राहिलेली नाही तर गोमुत्राबद्दल आस्था काय असणार? आम्ही प्रत्येक धार्मिक धार्मिक विधीत गोमूत्राचा वापर करतो. नारायण राणे साहेब जेव्हा मंत्री झाले, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे जाऊन नतमस्तक झाले. त्यानंतर तुमच्या सैनिकांनी तेथे शुद्धीकरण करण्याचा निमित्ताने गोमूत्र कसे शिंपडले? याच उद्धव ठाकरेंची मुले कधी आणि कुठच्या हॉटेलमध्ये बीफ खातात याची माहिती मी लवकरच देणार आहे, असेही ते म्हणाले.

