किरणमयी आर कामथ निर्मित ‘अंत्यारंभ’, हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन प्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय, पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण आजवरच्या ८ कोकणी चित्रपटांतील ४ कोकणी चित्रपट त्यांनी स्वतः बनविले आहेत.
‘अंत्यारंभ’ हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ. रमेश कामथ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ, विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी, संगीत प्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे. संवादलेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.