Homeबॅक पेजराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा सरसंघचालक!

स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादन केले होते की, “वेदांत आणि विज्ञान झोपडीझोपडीपर्यंत पोहोचविल्याशिवाय या देशातील दरिद्रीनारायणाचा नवकोट नारायण होणार नाही.” त्यांचे हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साकार केले.

२७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि आधुनिक भारताच्या इतिहासात एक नवे सोनेरी पान लिहिले गेले. डॉ. हेडगेवार हे केवळ वैद्यकीय व्यवसायातील तज्ज्ञ होते असे नाही तर त्यांना प्रथमश्रेणीचे समाजशास्त्रज्ञ असेही म्हटले पाहिजे. हिंदू समाजातील गुणदोषांचे वस्तुनिष्ठ आकलन करून या विराट समाजपुरुषातील चैतन्य जागृत करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे अखिल भारतीय संघटन अत्यंत कुशलतेने व दूरदृष्टीने स्थापन केले. गेल्या १०० वर्षांतील संघाच्या वाटचालीचे वर्णन म्हणजे ‘राष्ट्रजीवनातील चैतन्यपर्व’ असे करावे लागेल.

डॉक्टरांच्या दिव्यदृष्टीचे आदर्श समोर ठेवून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींनी संघाला १९४० ते १९७३ तीन दशकांचे खंबीर नेतृत्त्व दिले. त्यांनी  आध्यात्मिक ब सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया घातला. त्यानंतर बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक समरसतेचा सिद्धांत मांडला व तो कृतीमध्ये आणला. डॉ. राजेंद्रसिंह तोमर उर्फ रज्जूभैय्या यांनी संघ गंगा-यमुनेपासून हिमालयापर्यंत नेऊन ठेवला. त्यांनी ‘जगातील हिंदूंनो एक व्हा’ अशी हाक दिली. के. सुदर्शन यांनी त्या काळात डावीकडे वळणाऱ्या भारतीय तरुणांना हिंदुत्वाचे तेजस्वी रूप दर्शविले. डॉ. मोहन भागवत यांनी भविष्यकालीन भारताचे आदर्श चित्र रेखाटले आणि ते नरेंद्र मोदी युगात (२०१४ ते आजपर्यंत) प्रत्यक्षात कृतीत आले. भारतीय राष्ट्रजीवनाच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा हा संघ साक्षीदार आहे. निरपेक्ष सेवाकार्य हे राष्ट्राच्या बांधणीतील अत्यंत महत्त्वाचे सूत्र असून राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण हे संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे. यादृष्टीने संघाच्या गेल्या १०० वर्षांतील वाटचालीचा शास्त्रीय आलेख ‘सहा सरसंघचालक’ या ग्रंथात मांडला आहे. शाश्वत विकासातील संघाची भूमिका हे भारताच्या भविष्यकालीन उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे “मी सागरात उडी टाकली हे लोक विसरले तरी चालेल पण मी सामाजिक सुधारणा सांगितल्या हे लोकांनी विसरता कामा नये.” समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठ नवभारताची उभारणी या संदर्भात रा.स्व. संघ सावरकरांचे स्वप्न साकार करीत आहे.

ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर आपल्या मनोगतात म्हणतात की, या ग्रंथात एकूण ११ प्रकरणे आहेत. त्यांपैकी ‘उष:काल’, ‘रा.स्व.संघ हिंदुत्वाचे चैतन्यपर्व’ या प्रकरणाचे स्वरूप प्रास्ताविक असे आहे. त्यानंतर क्रमाने डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्रसिंह, के. सुदर्शन, मोहन भागवत यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे सहा लेख आहेत. त्यानंतर ‘शतकोत्तर आव्हाने’, ‘संघ आणि शाश्वत विकास’ आणि ‘उपसंहार’ अशा तीन प्रकरणांचा समावेश आहे. शेवटचे प्रकरण वगळता, प्रत्येक प्रकरणात टीपा व संदर्भ दिले आहेत. मूळ लेख वृत्तपत्रांतील होते. त्यामुळे त्यामध्ये टीपा नव्हत्या. काही टीपा कंसात दिल्या होत्या. त्या सर्वांची नोंद तळटीपा म्हणून प्रत्येक पानावरच केली आहे.

सहा सरसंघचालक

लेखक: प्रा. डॉ. विजय धारूरकर

प्रकाशक: वरदा प्रकाशन

पृष्ठे: १८२

मूल्य: २५० रुपये

टपालखर्च: ५० रुपये

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...

वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य असे ‘मृत्युंजय भारत’!

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे. व्याख्यानांचे विषय- १) राष्ट्रीय...
Skip to content