प्रभात फिल्म कंपनीचा व्ही शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ २३ जानेवारी १९३२ला (६ फेब्रुवारी १९३२ अशीही प्रदर्शनाची तारीख आहे.) प्रदर्शित झाला होता. त्याची पटकथा एन. व्ही. कुलकर्णी व मुन्शी इस्माईल फारुक यांची होती. तर छायाचित्रण केशवराव धायबर यांनी केले होते. सोमवारच्या अयोध्येच्या राममंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या धामधुमीत या अयोध्येच्या राजाची आठवण झाली, त्यामुळे काळामधील विसंगती-संगती आणि कालमहिमाही दिसून आला…
हा मराठी भाषेत बनविलेला पहिला बोलपट होता. चित्रपटात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.
या चित्रपटाचे काय वैशिष्ट्य होते हे पाहाण्यासाठी विकीपीडीया पाहिला तर खूप छान माहिती मिळाली.
हा चित्रपट केवळ प्रभात फिल्म कंपनीचा पहिला बोलपट चित्रपट नव्हता, तर त्याचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचाही होता. त्यांच्या काळात, तो केवळ आवाज, गाणे आणि संवादाच्या गुणवत्तेतच नाही तर तो चित्रपट म्हणजे सामाजक झेप ठरला होता. कारण मराठी चित्रपटसृष्टीत उच्च वर्गातील आणि उच्चभ्रू कुटुंबातील दुर्गा खोटे यांच्या प्रवेशाने उच्च वर्गातील इतर महिलांना चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.
सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या आयुष्यावर आधारित असणारा हा चित्रपट आहे. येथे राजाची परीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्रमुनी दक्षिणा म्हणून सिंहासनाची मागणी करतात. त्यामुळे सत्यवचनी राजाला काशीला जाऊन हलकीसलकी कष्टाची कामे करावी लागतात. तर राणी तारामती घरकामे करू लागते. त्यानंतर गंगानाथ तिला लिलावात विकत घेतो. त्याची राणीवर पापी नजर असते. एका अवघड प्रसंगी रोहिदास आईच्या सुटकेला धावतो. पण तो गंगानाथकडून मारला जातो. ते बालंट तारामतीवर येते. तिला शिरच्छेदाची शिक्षा होते. ती कामगिरी डोंबाघरी राबणाऱ्या हरिश्चन्द्रावर येते. पण ऐनवेळी शंकर प्रकट होतात आणि तारामतीला वाचवतात. अशा रीतीने राजा हरिश्चंद्र विश्वामित्र ऋषींच्या परीक्षेला पुरेपूर उतरतो. प्रसन्न झालेले ऋषी राजाला त्याचं राज्य परत करतात.
आता अशी ही अयोध्येच्या राजा हरिश्चंद्राची कथा सध्याच्या युगात ऐकणेही विश्वासार्ह असणार नाही. असे राजे मिळत नाहीत, तशी अयोध्याही राहिलेली नाही. अशा या अयोध्येवर राजा रामाचेही राज्य होते आणि हरिश्चंद्राचेही राज्य होते. तसे पाहायला गेले तर दोन्ही व्यक्ती वेगळ्या होत्या. त्यांचा त्यांचा काळही वेगळा होता. पण भारतभूमी तीच आहे. त्या भारत वा भरतभूमीमध्ये (इंडिया नव्हे) यापुढे असणारा ‘अयोध्येचा राजा’ कसा असावा, त्याचे चित्र, त्याची संकल्पना प्रत्येक भारतीयाने मनात उतरावयाला हरकत नाही. दुर्दैवाने ती प्रतिमा केवळ शब्दांत साकारलेल्या रामराज्यासारखी नसावी, इतकीच अयोध्येच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अपेक्षा.