जयंत नारळीकर… मनःपटलासमोर हे नाव आले की माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८८पासूनच्या काही आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात. आठवणींचे हे कोलाज मनात, डोळ्यासमोर येते आणि त्यातून आपले मन मनातल्या मनात या थोर वैज्ञानिकासमोर नतमस्तक होत आहे, हे जाणवू लागते. विद्यापीठीय पातळीवर खगोलसंशोधनाला चालना मिळावी, यासाठी एखादी संस्था असावी म्हणून आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र स्थापन करण्यात आले. अर्थातच, त्या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या पन्नाशीतील जयंत नारळीकर यांची या केंद्राचे सर्वेसर्वा म्हणून निवड करण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या आवारातील जमीन ताब्यात येण्यापासून ते आयुका, ही खगोलसंशोधनातील जगन्मान्य संस्था उभी करण्यापर्यंत सिंहाचा वाटा नारळीकर यांचा आहे. आयुकाच्या आधी केंब्रिजमध्ये संशोधन करताना आपले गुरू फ्रेड हॉईल यांच्यासह केलेल्या कामानंतर नारळीकर यांना पद्मभूषण, या नागरी सन्मानाने भूषविण्यात आले होते. केवळ २५-२६व्या वर्षी पद्मभूषण मिळवणारे जयंत नारळीकर हे एकमेव व्यक्ती आहेत.
भारत सरकारने १९६०च्या दशकात हा सन्मान दिल्यानंतर या तरुण संशोधकाने जागतिक पातळीवर नेमके काय योगदान दिले आहे, हे देशातील जनतेला समजावे, यासाठी तत्कालीन राष्ट्रपतींनी पंचविशीतल्या जयंत नारळीकर यांना स्टेट गेस्ट म्हणजे राष्ट्राचे पाहुणे हा दर्जा देऊन भारतात व्याख्यानांसाठी निमंत्रित केले होते. साधारणपणे अन्य देशांचे राष्ट्रप्रमुख वगैरेंना असा स्टेट गेस्टचा दर्जा दिला जातो. त्या काळात म्हणजे १९६३-६४मध्ये देशातील अनेक शहरांत नारळीकर यांनी त्यांचे संशोधन सोप्या शब्दात मांडले. त्यांची व्याख्याने ऐनवेळी छोट्या सभागृहांऐवजी मोकळ्या मैदानांवर घ्यावी लागत इतकी गर्दी उसळत असे. नवी दिल्लीत एका सभागृहातील व्याख्यानाला इतकी गर्दी उसळली की इंदिरा गांधी यांना सभागृहात प्रवेश करता आला नाही आणि त्यांना नारळीकर यांचे व्याख्यान विंगेत खुर्ची टाकून ऐकावे लागले होते. गंमतीचा भाग असा की, व्याख्यानानंतर नारळीकर यांना भेटण्यासाठी इतकी गर्दी उसळली की इंदिरा गांधी यांना इच्छा असूनही नारळीकरांना भेटता आले नाही. मला स्वतः नारळीकर सरांनीच हे सांगितले होते. पुढे पंतप्रधान झाल्यावर इंदिरा गांधी यांनी त्यांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्षपद नारळीकर यांच्याकडे सोपवले होते.
केंब्रिजमध्ये संशोधन करत असताना पुढे जगविख्यात विज्ञानकथा लेखक बनलेले स्टीफन हॉकिंग हे नारळीकर यांच्यापेक्षा तीन-चार वर्षे ज्युनियर होते. त्यामुळे नारळीकर आणि हॉकिंग या दोघांना केंब्रिजमध्ये मानाचे समजले जाणारे एडम्स पारितोषिक विभागून मिळाले तेव्हा स्वतः हॉकिंग यांनी ही बातमी नारळीकर यांना फोनवरून आनंदाने सांगितली होती. त्यावेळी त्या दोघांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले गेले होते तर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पुढे नोबेल मिळवणाऱ्या रॉजर पेनरोज या संशोधकाला दिले गेले होते.
नारळीकर यांचे वडील विष्णुपंत नारळीकर केंब्रिजमध्येच गणितज्ञ झाले होते. त्यांना पं. मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये निमंत्रित करून प्राध्यापकपद दिले होते. त्यामुळे बनारसपणे बालपण घालवलेल्या जयंत नारळीकर यांचे हिन्दीही चांगले होते. बालपणी चंद्रकांतासारख्या पुढे टीव्ही मालिका झालेल्या गोष्टी त्यांनी बालपणी वाचल्या होत्या. त्याबरोबरच चिं. वि. जोशी या लाडक्या मराठी लेखकाचे चिमणराव गुंड्याभाऊ वाचत नारळीकर लहानाचे मोठे झाले. त्यांची आई सुमती नारळीकर, या आपल्या मुलांना म्हणजे नारळीकर आणि त्यांचे बंधू अनंत यांना पी जी वुडहाऊस या प्रख्यात ब्रिटिश लेखकाच्या गोष्टी वाचून दाखवत. लहानपणी पहाटे उठून संस्कृत स्तोत्रे ऐकल्यामुळे आणि उत्तम वाचनामुळे नारळीकर यांचे मराठी हिन्दी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळेच विज्ञानकथा लिहून तसेच विज्ञान सोप्या भाषेत सांगणारी व्याख्याने देऊन त्यांनी केलेल्या विज्ञानप्रसाराच्या कामासाठी त्यांना युनेस्कोने प्रतिष्ठेचा कलिंगा पुरस्कार दिला होता.

तरुण वयात पद्मभूषणसह अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळवणारे नारळीकर यांनी आयुकासारखी आंतरराष्ट्रीय योगदान करणारी संस्था उभी केली, तेव्हा व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कर्तृत्त्वही सिद्ध केले. मूलभूत संशोधनाचे काम करणाऱ्या वैज्ञानिकांमधे प्रशासनकौशल्य नसते, हा समज त्यांनी खोटा ठरवला. नारळीकर यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमानंतर चाहते भेटत आणि स्वाक्षरी मागत. नम्रपणे पण ठामपणे सही द्यायला नकार देऊन नारळीकर अशा सर्व चाहत्यांना सांगायचे की तुम्ही मला पत्र पाठवून तुम्हाला जिज्ञासा असलेल्या विषयातील कोणताही प्रश्न मला पाठवा. त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवेन आणि त्याखाली माझी स्वाक्षरी करून पत्र पाठवेन. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी अशा पत्रोत्तरात स्वाक्षऱ्या दिलेल्या पत्रांची संख्या वीस हजारांवर होती, असे मला आठवते.
एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खगोलसंशोधक, उत्तम प्रशासक आणि दृष्टी असलेले नेतृत्त्व, याबरोबरच विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या पाठीशी उभे राहणारे, हीदेखील नारळीकर यांची एक ओळख होती. फलज्योतिष या विषयाचा विज्ञान शाखेत अभ्यासासाठी समावेश करण्याचा प्रयत्न डॉ. मुरली मनोहर जोशी केंद्रीय मंत्री असताना केला गेला होता. त्यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. यश पाल आणि नारळीकर या दोघांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मानव्यविद्या किंवा ह्यूमॅनिटीजच्या अंतर्गत कोणत्याही विषयाचा अभ्यास करायला हरकत नाही. पण फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नसल्याने त्याचा अंतर्भाव विज्ञानशाखेत करू नये, ही नारळीकर यांच्यासह यश पाल यांनी केलेली विनंती पंतप्रधानांनीही मान्य केली होती. पंतप्रधान वाजपेयी यांना पत्र पाठवल्यानंतर पुण्यात टीव्हीवाल्यांना संपर्क करून जाहिरातबाजी करणाऱ्यांपैकी नारळीकर नव्हते. नवी दिल्लीतून प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून ही बातमी आली तेव्हा आम्ही पुण्यातील पत्रकार नारळीकर यांच्याकडे धावलो होतो. आपली भूमिका ठाम असेल तर माध्यमांना दखल घ्यावी लागते, हे दाखवून देणाऱ्या नारळीकर यांची ही आठवण आजच्या काळात विशेष लक्षात राहणारी आहे.
आयुकामधून निवृत्त झाल्यावरही संशोधन कार्य सुरू ठेवणाऱ्या नारळीकर यांनी सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून काम केले. आयुकात दुपारी चहाचा ब्रेक झाल्यावर किंवा एखाद्या कार्यक्रमानंतर चहापानाच्या वेळी संचालक असलो तरीही इतर सर्वांच्या बरोबर रांगेत उभे राहून चहा घेईन, ही ठाम भूमिका घेणारे संचालक अपवादानेच आढळतील. विज्ञाननिष्ठेला जीवननिष्ठा बनवणारे नारळीकर यांनी खगोलसंशोधनाच्या क्षेत्रात अमूल्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील योगदान केले, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींना शुद्ध वर्तनातून आपली ध्येये गाठता येतात, प्रसंगी नम्रपणे पण ठामपणे नकार दर्शवत आक्रस्ताळेपणा न करता विरोध दाखवता येतो, हेही त्यांनी शिकवले. कोण म्हणत आहे, यापेक्षा काय म्हणत आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीतला गाभा मुद्दा काय आहे, कळीचा प्रश्न कोणता आहे, हे पटकन समजून घ्यावे, हेही त्यांनी त्यांच्या आचरणातून वारंवार दाखवून दिले. त्यांच्यासारखा त्यांच्या उंचीचा खगोल संशोधक होईल की नाही, माहीत नाही. पण त्यांच्यासारखा आपल्या मूल्यांवर गाढ विश्वास ठेवून जगणारा, ती मूल्ये तपासून बघणारा, कर्तव्यकठोर होतानाही नम्रपणा, मऊपणा जपणारा आणि छोट्यात छोट्या (वयाने, कर्तृत्त्वाने) व्यक्तीलाही आदर दाखवून त्याचे म्हणणे ऐकून घेणारा, व्यक्ती म्हणून सन्मान देणारा बुद्धिप्रामाण्यवादी सुसंस्कृत माणूस व्हायला त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांनाच नक्की आवडेल, याची मला तरी खात्री आहे.
(लेखक शैलेंद्र परांजपे यांनी दूरदर्शनसाठी जयंत नारळीकर यांची सविस्तर मुलाखत युट्यूबवर https://youtu.be/wWyz0u1Hmrc?si=PK9c5ToBQl6LcaGl लिंकवर पाहता येऊ शकेल.)