Homeचिट चॅटके. पी. जाधव...

के. पी. जाधव यांचे निधन

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. म्हाडाच्या ओनरशिप वसाहतीतील अत्यंत जुन्या अशा सिद्ध गृहनिर्माण सहकारी संस्थेचे जाधव गेल्या ४० वर्षांपासून मानद सचिव होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ नगर महापालिका शाळेच्या सभागारात जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान व पुण्यानुमोदन (शोकसभा) कार्यक्रम होणार आहेत.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेले मळण हे त्यांचे जन्मगाव. रिझर्व्ह बँकेत क्लार्कपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदाची सांभाळून जाधव मार्च २००३मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र नोकरीत असल्यापासूनच ते या परिसरातल्या विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. सदैव हसतमुख आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे जाधव यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थेबद्दल विशेष अभ्यास होता. सिद्ध सहकारी संस्थेचा ते चालताबोलता इतिहास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या कामात स्वतःाला झोकून दिले होते.

साधारण १६ वर्षांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. मात्र, त्यानंतरही ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. साधारण आठवड्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना गोरेगावातल्याच एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनाही ते उत्तम प्रतिसाद देत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. परंतु शुक्रवारी संध्याकाळी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानिमित्त मळण गावातल्या सामाजिक संस्था तसेच गुहागरमधल्या बौद्धजन सहकारी संस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ नगर मनपा साळा संकुल (मुंबई पब्लिक स्कूल, सिद्धार्थ नगर रोड नं. १, प्रबोधन मैदानाजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४) येथे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान तसेच इतर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content