देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, अशा अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. खरेतर, नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचेच काम केले असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टीचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मंगळवारी, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार आदी उपस्थित होते.
आता राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही. पूर्वी नैतिक राजकारण केले जात असे. राजकारणात विरोधकांचाही सन्मान केला जायचा. आता होतो तशी एकमेकांवर चिखलफेक होत नव्हती. टीकेला उत्तर देताना नैतिकतेची मर्यादा सांभाळली जात होती. आमच्याकडे शिव्यांचा खूप साठा आहे. पण आम्ही राजकारणात संयम ठेऊन विरोधकांना उत्तर देतो. अलीकडे मात्र एकमेकांना शिव्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. मनाचा मोठेपणा ठेऊन विरोधकांचाही आदर राखण्याची नैतिकता आता राजकारणात दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे, या विरोधकांच्या आरोपावर आठवले म्हणाले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून मते मिळविण्यासाठी अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु आता अफवा पसरवून आणि समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. येत्या दीड वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल. बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे.

बाळासाहेबांमुळेच आरपीआय, शिवसेना-भाजप युतीसोबत
२०१२ साली वांद्रे येथे राहयला गेलो तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांना शेजारी नात्याने भेटायला गेलो. तेव्हा बाळासाहेबांनी आपल्याशी दीड तास चर्चा करत शिवशक्ती -भीमशक्ती एकत्र येण्याची साद घातली. तेव्हा विचारधारा वेगळी असली तरी काही किमानसमान कार्यक्रमाचे मुद्दे ठरवून आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आरपीआय जेव्हा शिवसेना-भाजप युतीसोबत आली. तेव्हापासून युतीची महायुती झाली असल्याचे आठवले यांनी सांगितले.
मी महायुती सोबत प्रामाणिक
महायुतीच्या जागावाटपात आरपीआयला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आरपीआय सध्या बॅकफूटवर गेली आहे. मागून आलेला राष्ट्रवादीसारखा पक्ष जागावाटपात पुढे गेला. माझ्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला लोकसभेची एक जागा दिली जात नाही हा माझ्या वर अन्याय आहे. परंतु नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण चार पावले मागे घेत राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महायुती अडचणीत असल्याने या कठीण काळात आपण महायुतीसोबत प्रामाणिक राहणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी वेगळा ओबीसी प्रवर्ग करा
मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्वप्रथम आरपीआयने केली होती. तामिळनाडूच्या धर्तीवर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी वर्गाचे सध्याचे २७ टक्के आरक्षण कायम ठेवून दुसरा ओबीसी प्रवर्ग तयार करून त्यात मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

