पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आपण, आमच्या उमेदवाराला निवडून द्या. या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करू, असे म्हटले होते. आणि आज पुन्हा सांगतो की, योग्य वेळी महाराष्ट्रातल्या या सरकारचा करेक्ट कार्यक्रम होईल. काय घडणार आहे हे आपल्याही लक्षात येईल. पण, आता ती वेळ नाही. आता कोरोनाविरूदधच्या लढाईत आम्ही सरकारला मदत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना त्यांनी यासाठी तेथील जनतेचे तसेच पक्षाच्या विविध नेत्यांचे आभार मनले. गेल्या दीड वर्षांत या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारी कारभारामुळे जनता चिडली होती. वीजजोडण्या तोडण्याची कारवाई, कोरोना काळात बारा बलुतेदारांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण, यामुळे जनता वैतागली होती आणि त्यांनी आपला कौल दिला. सत्तेतल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या तीनही पक्षांनी एकत्रितपणे लढत दिली. सरकारी यंत्रणा, पैसा यांचा गैरवापर केला. परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असेही ते म्हणाले.
बंगालमध्ये तीनवरून इथपर्यंत
बंगालमध्ये आम्ही तीन जागांवरून इथपर्यंत आलो. या निवडणुकीत काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष सपाचट झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला झाला. आतापर्यंत तेथे काँग्रेस व कम्युनिस्टांचाच बोलबाला होता. आता बंगाल काँग्रेस व कम्युनिस्टमुक्त झाला आहे. महाराष्ट्रातली जनताही जिगरबाज होती म्हणून त्यांनी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपाला निवडून दिले होते. त्यासोबत तुम्हालाही दिले. पण तुम्ही विश्वासघात केला आणि ज्यांना नाकारले त्यांच्यासोबत सत्तेत बसला. कोरोनाची काय स्थिती आहे आणि आपण काय करतो आहोत, याची खरे त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
आसाममध्ये आम्ही सत्ता राखली. पुद्दूचेरीत सत्ता मिळवली. बंगालमध्ये तीन जागांवरून इथपर्यंत आलो. तामिळनाडूत आमचा सफाया होणार असे म्हटले जात होते तेथे आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. बेळगावीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मते फोडण्यासाठीच उभे केले गेले हे आता अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले.