Homeपब्लिक फिगरमातोश्रीवर बसून फक्त...

मातोश्रीवर बसून फक्त हकालपट्टीच करणार काय?

उद्धव ठाकरे किती लोकांची अशी हकालपट्टी करणार आहेत? ५० आमदारांची हकालपट्टी केली. आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत. त्या सर्वांची हकालपट्टी करणार आहात? मातोश्रीवर बसून आता एव्हढेच काम शिल्लक राहिले आहे का?, असा सवाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज विविध वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीत केला. हकालपट्टी करण्यापेक्षा हकालपट्टी करण्याची वेळ का आली, यावर त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही कदम यांनी ठाकरे यांना दिला.

ते माझी कसली हकालपट्टी करतात? हकालपट्टी करण्याआधीच मी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेत झालेल्या मनस्तापाला वाट मोकळी करताना अनेकदा त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत.

मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. दंगली झाल्या तेव्हा तिथे मी पोहोचलो. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला. नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो, याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढले आणि आधी राजीनामा फेकला, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली आहे. मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना टाहो फोडून सांगत होतो, अजित पवार रोज सकाळी ७ वाजता मंत्रालयात जातात. १०० आमदार कसे निवडून आणायचे याचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे आणि जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे ते आपल्या उमेदवाराला ताकद देत शिवसेनेला संपवण्याचे कटकारस्थान रचतात. पण काही झाले नाही. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते, असेही रामदास कदम यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती. कोरोना होता हे मान्य. पण, शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते. शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदे द्यायची, पाच कोटी दिले. तुम्ही मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत आहेत. सगळे आमदार सांगत असतानाही तुम्ही शरद पवारांना सोडत नव्हता. ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभे केले. ज्यांच्या हयातीत शरद पवार यांना शिवसेना फोडण्यात यश आले नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्कीर्दीत करून दाखवले, असेही ते म्हणाले.

हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसे येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले पाहिजेत. गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी केली होती. पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का? आदित्य ठाकरेंचे वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचे भान ठेवा, असेही त्यांनी सुनावले.

मी एकनाथ शिंदेंसोबत जाणार. सभा, बैठका घेणार. पण कोणालाही मातोश्रीवर बोलू देणार नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करू देणार नाही. जे शरद पवार, अजित पवार यांना हवे आहे ते होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. अनिल परब, विनायक राऊत यांचावरही त्यांनी जहरी टीका केली.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content