मोहम्मद शमी सच्चा मुसलमान आहे का? हा प्रश्न काल दिवसभर समाजमाध्यमांवर चघळला जात होता. निमित्त होते ते सध्या सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे. सध्या दुबई आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त आयोजनातून चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. चार मार्चला, मंगळवारी दुबईत यातली पहिली सेमीफायनल खेळवली गेली. या सामन्याच्या दरम्यान मैदानात गोलंदाजी संपल्यावर फिल्डिंग करताना मोहम्मद शमी बाटलीतून एनर्जी ड्रिंक घेत होता. अनेक वाहिन्यांवरून हे दृष्य दिसले आणि कट्टरपंथीय मुसलमानांचा तीळपापड झाला. रमझान सुरू असताना रोझा न पाळता शमी वावरूच कसा शकतो, असा सवाल त्यांनी समाजमाध्यमांवर सुरू केला. सच्चा मुसलमान फक्त अल्लाहला सर्वोच्च मानतो. त्यानंतर देश किंवा इतर काही गोष्टी. जो रमझानच्या महिन्यात रोझा पाळत नाही तो सच्चा मुसलमान होऊच शकत नाही, अशी भूमिका या कडव्या मुसलमानांनी समाजमाध्यमांवर मांडली आणि याच मुद्द्यावरून काल दिवसभर मोहम्मद शमी ट्रोल होत होता.
बरेलीचे मौलवी शहाबुद्दीन रजवी म्हणाले की, जो रोझा ठेवत नाही तो दोषी आहे. शरियतच्या नजरेत त्याने घोर अपराध केला आहे. मी शमीला ताकीद देतो की, त्याने इस्लामचा अपमान करू नये, हे खपवून घेतले जाणार नाही. देशाप्रती असलेली जबाबदारी ओळखताना शमी इस्लामप्रती असलेली जबाबदारी कशी विसरला? तशाच प्रकारची मते आणखी दोन-चार मौलवींनी व्यक्त केली आणि या साऱ्या मतप्रदर्शनाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत होते.
मोहम्मद शमीचा कोच मोहम्मद बद्रुद्दीन यांनी या टीकाकार मौलवींना लगेचच प्रत्त्युत्तर केले. मोहम्मद शमी सच्चा मुसलमानच आहे. सध्या तो प्रवासात तसेच परदेशात आहे आणि प्रवासात असताना रोझे ठेवणे बंधनकारक नाही. अशा व्यक्तीने घरी परतल्यावर रोझे ठेवून त्याचे परिमार्जन करावे, अशी इस्लाममध्ये मुभा आहे. त्याप्रमाणे शमीही घरी परतल्यावर रोझे ठेवणार आहे, असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहसीन रझा यांनी शमीवर टीका करणाऱ्या मौलवींचा समाचार घेताना अल्लाह आणि भक्तामध्ये थेट संबंध असताना मध्ये लुडबूड करणाऱ्या मुल्लाचे काम काय, असा सवाल केला आहे.
इस्लामनुसार मुसलमानाने पाच कर्तव्ये पार पाडायला हवीत. १. शहादा (अल्लाहवर विश्वास असल्याची घोषणा करणे), २. सलाह (प्रार्थना करणे म्हणजेच नमाज पढणे), ३. झकात (दानधर्म करणे), ४. स्वॉम (उपवास करणे म्हणजेच रोझा ठेवणे) आणि ५. हज (तीर्थयात्रा करणे). यात रोझा ठेवण्यामध्ये काही गोष्टींना मान्यता देण्यात आली आहे. जसे की, आजारी माणसाला यातून सूट देण्यात आली आहे. जो प्रवासात असेल तर तोही यातून सूट घेऊ शकतो वगैरेवगैरे. शमीने अशी सूट घेतलेली आहे. पण, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या बहुतांशी खेळाडूंनी याच चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेत तशी सूट घेतली नव्हती. तशी ते इतर स्पर्धेतही घेत नाहीत. शमीने जसे या स्पर्धेत रोझा ठेवला नाही तसा तो पाकिस्तानच्या शादाब खान आणि इंग्लंडच्या मोईन अली यांनीही ठेवला नाही. पण, त्यांना कोणी ट्रोल करण्याच्या भानगडीत पडले नाही. मग, मोहम्मद शमीला या विषयावरून ट्रोल करून स्पर्धेची फायनल समोर असताना त्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
रोहित शर्मालाही केले होते लक्ष्य
मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरूद्धचा उपांत्य फेरीचा सामना सुरू होण्याआधीच काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला एक्सवर लक्ष्य केले होते. रोहितची शरीरयष्टी खेळाडूला साजेशीच नाही. त्याला क्रिकेट संघात स्थान मिळणे हे त्याचे नशीब आहे. खरेतर तो बाहेर बसवण्याच्याच लायकीचा आहे… वगैरे.. वगैरे.. तारे त्यांनी तोडले होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनीही शमा मोहम्मद यांचे समर्थन करत रोहित शर्मावर तोंडसुख घेतले होते. काँग्रेसने लगेचच शमा मोहम्मद यांच्या ट्विटपासून पक्षाला वेगळे केले. ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे काँग्रेसचे पवन खेरा यांनी जाहीर केले. त्यानंतर स्वतः शमा यांनीही हे ट्विट डीलीट केले. बीसीसीआयकडून लगेचच शमा यांना प्रत्त्युत्तर देण्यात आले. कित्येक क्रिकेटशौकिनांनी शमा यांनाच नंतर ट्रोल केले आणि शमा यांनाच नंतर घूमजाव करावे लागले. आपण इतर भारतीय कप्तानांच्या तुलनेत रोहितची तुलना केली होती आणि लोकशाहीत आपल्याला तसा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. थोडक्यात काय, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याआधी भारतीय खेळाडूंना अशा प्रसंगांनाही सामोरे जावे लागत आहे.