राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या (पू.)च्या एका टोकाला असलेल्या साकीनाका विभागातील झोपड्या व छोट्या कारखाने तसेच गॅरेजनी किचाट झालेला सुमारे दीड एकराचा भूखंड पुनर्वसनासाठी मिळाला तर काय मज्जाच मज्जा होईल, खोऱ्याने पैसा ओढता येईल या नुसत्या कल्पनेने बिल्डर्स, राजकीय नेत्यांना किती आनंदाचे भरते येईल हे सांगायला मी नकोच! ज्याची त्यानेच कल्पना केलेली बरी. अशीच काहीशी अवस्था अंधेरी-कुर्ला येथील भूखंड क्रमांक CTS – 465ची झाली आहे. रस्त्यासाठीचा भूभाग सरकार वा महापालिकेला देऊन तब्बल 4600 चौ. मीटर्सचा हा हलवा भूखंड सध्याच्या स्थितीत कोण हातातून सोडेल काय? उत्तर आहे, मुळीच नाही. उलट येनकेन प्रकारे तो आपल्यालाच मिळावा म्हणून सर्वच प्रयत्न करणार हे तर उघडच आहे.
असाच काहीसा प्रकार मरहूम नसीमा बेगम यांच्याबरोबर झाला. या नसीमा बेगम यांचे 1991मध्ये निधन झाले. निधन होण्याआधी नसीमा बेगम यांनी अब्दुल जब्बार खान यांच्याबरोबर मुखत्यारपत्र तयार केले होते. त्याअन्वये बेगम यांनी तो भूखंड जब्बार खान यांना विकला होता. आता पुढे खरी मजा सुरु झाली व मालकीबाबत वाद सुरु झाला. कुणी अर्शद सिद्दीकी नामक व्यक्तीने 1989मध्ये आणखी एक, दुसरे मुखत्यारपत्र सादर केले. त्यातही आणखी कुणी अब्दुल सत्तार खान आहे असे दाखवण्यात आले. या मुखत्यारपत्रावरील सह्यांची तपासणी केली गेली. एकदा नाही तर तीन वेळा! दावे, प्रतिदावे करण्यात आले. अखेर 2022मध्ये सह्याच्या तपासणीत दुसऱ्या मुखत्यारपत्रातील सह्या जुळत नसल्याचा अभिप्राय आला.
यानंतर या निर्णयाने समाधान न पावल्याने अर्शद सिद्दीकी आणि तेथील रहिवासी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयात अर्शद हाही प्रतिवादी होता. परंतु हा निकाल अर्शदच्या विरोधात गेल्याने त्याने वेगळाच मुद्दा पुढे आणला की भाडेकरू मुखत्यारपत्राला आव्हान देऊ शकत नाहीत. दरम्यान अर्शद याने आपली राजकीय खेळी सुरु केली व तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागला. हळूहळू त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक साधली. याप्रकरणी याआधी बाबा सिद्दीकी यांच्याशी अर्शदशी दोन-तीन वेळा बैठक झाल्याचे सूत्रांनी सूचित केले. काही महिन्यांपूर्वी बाबा यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने हा भूखंड आपल्यालाच मिळणार या आनंदात तो होता. दरम्यान त्या मुखत्यारपत्रावरील सह्यांची फेरतपासणी तब्बल दोन वर्षे पोलीस व संबंधित यंत्रणानी प्रलंबित ठेवल्याचेही समजले. या सुमारे दीड एकर भूखंडाची किमंत आम्ही ठरवू शकत नाही. परंतु बाजारभाव व मार्केटचा अंदाज घेता ही किमंत 350 कोटी रुपयांच्या घरात जाते, असे समजले.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बाबा सिद्दीकी हत्त्येचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केल्याने काहीसे हायसे वाटत आहे. त्यात या तपासाची सूत्रे पोलीस अधिकारी दया नायक यांच्याकडे सोपवल्याने टिकाकारांना शांत करणे पोलिसांना साध्य झाले आहे. मात्र पोलिसांची तपासात कसोटीच लागणार आहे. शिवाय निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय दबाव असणारच. खरं तर बिष्णोईची मुंबईत गँगच नाही. तो हल्ली विविध शहरात कंत्राटी माणसे ठेवून कामे करवून घेतो, असे गुन्हेगारी जगतात बोलले जाते. कळीचा मुद्दा हा आहे की, बिष्णोईला जेलमध्ये असतानाही मोबाईल फोन वापरू कसा देतात? जेलच्या टॉवरवरून तो कुणाला फोन करत असेल, हे शोधणे अवघड नाही. पण गुन्हेगार मोबाईलची सिम सतत बदलत असतात हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर